सोलापूर, 18 जानेवारी: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर झाले. 34 जिल्ह्यांतील 12 हजार 711 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारी रोजी मतदान झालं होतं. मोहोळ तालुक्यातील घाटणे येथे 21 वर्षाचा तरुण ऋतुराज रवींद्र देशमुख यांनी विजय मिळवत सर्वांत तरुण विजयी उमेदवार होण्याचा मान पटकवला आहे. तर बार्शी तालुक्यातील तुळशीदासनगर ग्रामपंचायत निवडणुकीनं सगळ्यांच लक्ष वेधलं. तुळशीदासनगर ग्रामपंचायतीवर एक-दोन नाही तर 5 गटांनी वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. निवडणुकीत आईचा विजय तर मुलाचा परभाव झाल्यानं यंदाची निवडणूक चांगलीच लक्षवेधी ठरल्याची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा आहे.
हेही वाचा....राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला भगदाड, माजी मुख्यमंत्र्यांच्या गावात फुललं 'कमळ'
एकाच कुटुंबातील चौघांचाही पराभव...
तुळशीदासनगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 7 जागांसाठी एकूण 18 उमेदवार रिंगणात उतरले होते. माजी सरपंच पुष्पा कोळेकर यांच्या कुटुंबातील चार सदस्यांनी या निवडणुकीत नशीब आजमावलं. मात्र, एकही सदस्याला विजयश्री खेचून आणता आली नाही. विशेष म्हणजे या निवडणुकीत पाच गटांना मतदारांनी संधी दिली. विजयी गटात राऊत, सोपल, भूमकर, निंबाळकर आणि मिरगणे यां 5 गटांमधील सात सदस्य निवडून आले. विशेष म्हणजे सासू छाया पाटील आणि सून सुनिता पाटील या दोघींच्या बाजुने मतदारांनी कौल दिला. तर आई उषा चांगदेव उबाळे विजयी झाली आणि मुलगा विजय चांगदेव उबाळे यांना पराभवाचा सामना करावा लागला.
विरोधी गटाच्या एकाही सदस्याला या निवडणुकी संधी मिळाली नाही.
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे...
संतोष नागनाथ राक्षे
सुनिता अभिजीत पाटील
छाया बाबासाहेब पाटील
दत्तात्रय रामकृष्ण थोरात
मोहन ज्ञानदेव मुळे
लक्ष्मी विकास सोलनकर
उषा चांगदेव उबाळे
21 व्या वर्षी झाला ग्रामपंचायत सदस्य...
सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातल्या घाटणे गावची निवडणूक ऋतुराज रवींद्र देशमुख या फक्त 21 वर्षांच्या तरुणाने जिंकली. ऋतुराजनं सध्या बीएसस्सीचे शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यानंतर आता तो LLB ला प्रवेश घेणार आहे. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत ऋतुराजने आपल्या घाटणे गावात निवडणुकीसाठी स्वत: चं पॅनेल उभं केलं होत. निवडणुकीच्या काळात ऋतुराजने तयार केलेला वचननामा चर्चेचा विषय ठरला होता. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी स्वतःचा वचननामा तयार करून गावच्या विकासाचा रोडमॅप सांगणारा ऋतुराज पहिलाच असावा.
हेही वाचा...Gram Panchayat Result 2021: पुण्यात कुठे फुललं कमळ तर कुठे राष्ट्रवादीचं वर्चस्व
ग्रामपंचायत निवडणूकीसाठी लोकनेते बाबुराव अण्णा पाटील ग्रामसमृद्धी पॅनल कडून त्याने निवडणूक लढवली. ऋतुराजने ग्रामसमृद्धी पॅनेलअंतर्गत 7 जागांवर उमेदवार उभे केले. त्यापैकी 5 जण विजयी झाले आहेत. स्वतः ऋतुराजला 103 मतं मिळाली असून त्यांच्या विरोधात 66 मतं आहेत. तर सदस्य म्हणून निवडून आलेल्या ऋतुराजला सरपंचपद भूषवण्याची संधी मिळणार का? हे आरक्षण सोडत निघाल्यानंतरच कळू शकेल. पण अशी संधी मिळाली तर तो राज्यातील सर्वाधिक तरुण वयाचा सरपंच ठरेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.