Home /News /maharashtra /

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला मोठं भगदाड, माजी मुख्यमंत्र्यांच्या गावात पहिल्यांदा फुललं 'कमळ'

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला मोठं भगदाड, माजी मुख्यमंत्र्यांच्या गावात पहिल्यांदा फुललं 'कमळ'

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात गहुली ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला आहे.

    यवतमाळ, 18 जानेवारी: राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी (Maharashtra Gram Panchayat Election Results 2021) मतमोजणी सुरू आहे. अनेक ग्रामपंचायतीत मतदारांनी प्रस्थापितांना धक्का देत नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याचं चित्र दिसत आहे. मात्र, दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात गहुली ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. तर काँग्रेसच्या दोन दिग्गज माजी मुख्यमंत्र्यांच्या गावात यंदा पहिल्यांदाच भाजपचं कमळ फुललं आहे. पुसद तालुक्यातील गहुली हे माजी दिवंगत वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांचं गाव आहे. गहुली ग्रामपंचायतमध्ये मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीची सत्ता होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला भाजपनं मोठं भगदाड पाडलं आहे. भाजपनं प्रथमच गहुली येथे 7 पैकी 7 जागांवर यश मिळवलं आहे. हेही वाचा...विजय ही राष्ट्रवादीचा आणि पराभव सुद्धा राष्ट्रवादीचाच, साताऱ्यातील लढतीचा निकाल चुलत भावांमध्ये होती काट्याची लढत... गहुली ग्रामपंचायत आता भाजपचे आमदार निलय नाईक यांच्या ताब्यात गेली आहे. सन 1949 पासून गहुली येथील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होत होती. मात्र, यंदा आमदार निलय नाईक आणि राष्ट्रवादीचे नेते इंद्रनील नाईक यांच्या काट्याची लढत झाली. गहुली येथे पहिल्यांदा होऊ घातलेल्या निवडणुकीत भाजपनं 7 पैकी 7 जागा पटकावल्या. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे निलय नाईक आणि इंद्रनील नाईक हे दोघेही माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या घराण्यातील आहेत. यामुळे निलय नाईक यांनी सोडली होती राष्ट्रवादीची साथ... गेल्या 70 वर्षांपासून यवतमाळच्या राजकारणात नाईक घराण्याचा वरचष्मा राहिला आहे. मात्र, 2009 च्या निवडणुकीत नाईक कुटुंबात अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. निलय नाईक यांनी अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. नंतर नाईक घराण्यातील वाद वाढतच गेला. अखेर निलय नाईक यांनी गेल्या महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादीला रामराम ठोकला. नंतर ते भाजपच्या गोटात सामील झाले. भाजपनं निलय नाईक यांची विधान परिषदेवर वर्णी लावली. हेही वाचा...पुण्यातील पुरंदरमध्ये राष्ट्रवादीला फटका, प्रस्थापित गाव पुढाऱ्यांना नाकारलं दरम्यान, वाशिम  जिल्ह्यात झालेल्या 163 ग्रामपंचायती पैकी 11 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या होत्या तर उर्वरित 152 ग्रामपंचायतींचा निकाल (gram panchayat election result 2021)सोमवारी जाहीर झाला. यामध्ये काँग्रेसला 25, शिवसेना 30, राष्ट्रवादी काँग्रेसला 24, भाजप ला 10 तर मनसेला एका ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापन करण्यात यश मिळालं. त्या राजकिय पक्षाकडून सांगण्यात आलंय तर स्थानिक विकास आघाड्याला 72 ग्रामपंचायतींमध्ये यश मिळालं आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: BJP, यवतमाळ

    पुढील बातम्या