पुणे, 18 जानेवारी: राज्यात 15 जानेवारीला ग्रामपंचायत निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील 4904 पैकी 649 ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले आहे. सर्व निकाल सायंकाळी 6 वाजेपर्यत जाहीर होतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.
पुणे जिल्ह्यात महाविकास आघाडीने सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला जात आहे. तर भाजपनेही अनेक ठिकाणी सत्ता राखल्याचा प्रतिदावा केला आहे.
हेही वाचा...उस्मानाबादचं नाव 'धाराशिव' करण्याचा वाद, भाजपनं बॅनरबाजी करून शिवसेनेला डिवचलं
दरम्यान, पुणे जिल्ह्यात 11 लाख 18 हजार 104 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. पुणे जिल्ह्यात एकूण 80.54 टक्के मतदान झाले. तर 95 गावांत बिनविरोध निवडणूक झाली.
पुरंदरमध्ये काँग्रेसचा राष्ट्रवादीला 'दे धक्का'
पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठ्या नीरा ग्रामपंचायतीत कॉंग्रेस पुरस्कृत नीरा विकास पॅनल विजयी झालं आहे. काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांनी दिला राष्ट्रवादीला धोबीपछाड दिला आहे. 17 पैकी 10 जागांवर काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत चव्हाण पॅनलला अवघ्या 4 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. 3 जागा भैरवनाथ पँनलला मिळाल्या आहेत. आमदार संजय जगताप यांच्यासाठी ही निवडणूक मोठ्या प्रतिष्ठेची झाली.
उरूळी कांचनमध्ये सत्तांतर...
पुणे जिल्ह्यातील दुसऱ्या नंबरची ग्रामपंचायत असलेल्या उरूळी कांचनमध्ये सत्तांतर झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
भैरवनाथ पँनलनं 17 पैकी 15 जागा मिळवल्या आहेत. महादेव कांचन यांचं पँनल विजयी ठरलं आहे. तर सुनील आणि राजाराम कांचन यांना पराभवाचा सामना करावा लागला.
मुळशीत आघाडीचं वर्चस्व...
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष केंद्रित केल्यानं चर्चेत राहिलेल्या मुळशीत महाविकास आघाडीचं वर्चस्व आहे.
मुळशी तालुक्यातील 45 ग्रामपंचातींचे निकाल जाहीर झाले आहेत. ह्यावेळी निवडून आलेल्या ग्रामपंचायती सदस्यांमध्ये सर्वाधिक सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारे असल्याने मुळशीत आघाडीचं वर्चस्व असल्याचं बघायला मिळत आहे.
सरपंचपदाच्या सोडती बाबत राज्य सरकारनं घेतलेला निर्णय आणि सुशिक्षित तरुणाच्या सहभागामुळे ह्यावेळी ग्रामपंचायतिचा मुळशी पटर्न कसा होता? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हवेलीत भाजपला धोबीपछाड...
हवेली तालुक्यात 54 पैकी 30 ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेल्या आहेत. 8 ग्रामपंचायतीत बिनविरोध निवडणूक झाली. 54 पैकी 30 ग्रामपंचायतींवर वर्चस्व सिद्ध केल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे. तर तीन ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता मिळवल्याचा दावा शिवसेनेनं केला आहे.
बारामतीत राष्ट्रवादीचं वर्चस्व कायम...
बारामती हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. अपेक्षेप्रमाणे यंदाही राष्ट्रवादीनं ग्रामपंचायत निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व कायम ठेवलं आहे.
बारामती तालुक्याचे लक्ष वेधून असलेल्या सांगवी ग्रामपंचायतवर अखेर 20 वर्षांनंतर परिवर्तन होऊन भाजपचा राष्ट्रवादीने पराभव करून मोठ्या ताकदीने आपले वर्चस्व आणून बाजी मारली आहे. माळेगाव कारखान्याचे माजी चेअरमन चंद्रराव तावरे यांच्या गटाकडे असलेली ग्रामपंचायत आता राष्ट्रवादीच्या ताब्यात आली आहे. वार्ड क्रमांक 1 व वार्ड क्रमांक 2 मधून सर्व उमेदवार राष्ट्रवादीने निवडून आणले असून भाजपने वार्ड क्रमांक 4 वर आपले वर्चस्व ठेऊन तिन्ही उमेदवार निवडून आणले आहेत.
राष्ट्रवादीने 15 पैकी आपले 10 उमेदवार उच्चांकी मतांनी निवडून आणून भाजपला मोठा धक्का दिला आहे. ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांची माळेगाव साखर कारखान्याची सत्ता हातून जाऊन राष्ट्रवादीने आपले वर्चस्व ठेवले होते, त्याच बरोबर आता चंद्रराव तावरे यांची 20 वर्षे असलेली गावची सत्ता देखील हातून गेली असून, राष्ट्रवादीने सत्ता प्रस्तापित करून आपला झेंडा ग्रामपंचायतीवर फडकवला आहे.
हेही वाचा...रावसाहेब दानवेंची मुलगी आणि जावई पराभूत, मुलगा आदित्यनेच उभे केले होते पॅनल!
इंदापूरात भाजप आणि राष्ट्रवादीचे दावे-प्रतिदावे...
नुकताच ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीतील मतमोजणी सुरू असून राष्ट्रवादी आणि भाजपा या दोन्ही पक्षाच्या नेत्यानी बहुमताचा दावा केला आहे. या निवडणुकीत काही ठिकाणी राष्टवादीला तर काही ठिकाणी भाजपाला मोठा धक्का बसला आहेत.
निमगाव केतकी येथील सत्ता भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीने हिराऊन घेतला. तर भिगवण येथील राष्ट्रवादीची सत्ता उलथावत एकहाती सत्ता मिळवली. या निवडणुकीत इंदापूर तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या लोणी देवकर या ग्रामपंचायतीवर भाजपाने सत्ता स्थापन केली. विधानसभेच्या या रंगीत तालमीत जनतेने आपला कौलमात्र संमिश्र दिला आहे.
दौंड तालुक्यात भाजप आमदारचं वर्चस्व...
दौंड तालुक्यामध्ये चुरशीने झालेल्या 51 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या गटाला सुमारे 32 ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवले आहे असा दावा भाजप आमदार राहुल कुल यांनी केला आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.