मुंबई, 25 नोव्हेंबर : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. अनेक राजकीय नेते आणि संघटनांनी भगतसिंग कोश्यारी यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. यानंतर अमृता फडणवीस यांनी राज्यपालांची पाठराखण करत मोठे वक्तव्य केले आहे. काय म्हणाल्या अमृता फडणवीस - मी राज्यपालांना जवळून ओळखते. त्यांना मराठी भाषेचे प्रेम आहे. ते एकमेव राज्यपाल आहेत जे मराठी शिकत आहेत. मराठी बोलण्याच्या वेगात ते काही बोलून जातात, त्याचा वेगळा अर्थ काढला जातो. त्यांना मराठी भाषेवर प्रेम आहे. मनापासून मराठी व्यक्तीवर प्रेम करणारे राज्यपाल आहेत. श्रद्धाबाबत झाले त्याबाबत दुःख होतंय. खोलात जावून तिला न्याय मिळाला पाहिजे. असा न्याय मिळाला पाहिजे की सगळे हादरले पाहिजेत. स्त्रीयांवर हात उचलायची, कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे. आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देणे गरजेचे आहे. भारताला पुढे न्यायचे आहे तर स्त्रीयांच्या सहकार्याची गरज आहे. स्त्रीयांनी सशक्त राहण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या. राज्यपालांसह फडणवीस दिल्ली दौऱ्यावर - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले आहे. या दौऱ्यात ते भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाची भेट घेऊन राज्यपालांच्या बदलण्याच्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यपाल बदलीबाबत केंद्रीय स्तरावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हेही वाचा - कोश्यारींसह फडणवीस निघाले दिल्लीला, राज्यपाल बदलीबाबत केंद्रीय स्तरावर चर्चेची शक्यता काय म्हणाले होते राज्यपाल - ‘आम्ही जेव्हा शिकत होतो, ते आम्हाला विचारत होते, तुमचा आवडता हिरो कोण आहे. आम्ही त्यावेळी सुभाषचंद्र बोस, नेहरू, गांधी जे चांगले वाटत असेल त्यांची नाव सांगत होतो. पण, आता महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील, शिवाजी तर जुने झाले आहे. नवीन काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत हिरो इथंच मिळतील’ असं म्हणत राज्यपालांनी गडकरी आणि पवारांची तुलना महापुरुषांशी केली. अनेक राजकीय नेते आणि संघटनांनी भगतसिंग कोश्यारी यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही राज्यपालांना सुनावलं आहे. ‘राज्यपालांबद्दल आम्हाला प्रोटोकॉलनुसार बोलता येत नाही, पण त्यांना काही प्रोटोकॉल नाहीये. ते काहीही बेफाम बोलतात, त्यांच्या पदाला ते न शोभणारं आहे,’ अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केलीय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.