मुंबई, 21 जुलै : गेल्या दोन वर्षांपासून राज्यावर कोरोनाचं सावट होतं. त्यामुळे राज्यात आयोजित केल्या जाणाऱ्या सण-उत्सव साजरा करण्यावर निर्बंध लावण्यात आले होते. दरम्यान आता राज्यात गणेशोत्सव आणि दहीहंडी धुमधडाक्यात साजरा होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. सार्वजनिक गणेशोत्सव, मोहरम, दहीहंडीनिमित्त कायदा व सुव्यवस्था आणि इतर बाबींसंदर्भात सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक पार पडली. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वृत्त पत्रकार परिषद घेत दिलं. विशेष म्हणजे गणेश मूर्तीच्या उंचीवरील मर्यादा काढून टाकण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दहीहंडी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे नियम पाळले गेले पाहिजे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. -दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांना टोलमाफी -पीओपीच्या मूर्तींबाबत एक तांत्रिक समिती नियुक्त केली जाणार असून, त्यामध्ये एमपीसीबी, निरी, आयआयटी, एनसीएल आदी संस्थांचे तज्ज्ञ प्रतिनिधी असतील. ही समिती पर्यावरणपूरक मार्ग काढेल. - गणेश मूर्तीच्या उंचीसंदर्भातील मर्यादा काढून टाकण्यात आल्या आहेत. -मंडळ उभारण्यासाठी गणेशोत्सव मंडळांसाठी सिंगल खिडकी सुरू करण्यात येणार आहे. -दोन्ही सण-उत्सवात सर्वोच्च न्यायालयाकडून लावलेले नियम पाळले जातील. - गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी राज्यभरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात यावेत. -राज्यभर उत्सवासाठी एक नियमावली राहील. जिल्हा प्रशासनांनी उत्सवासाठी नोडल अधिकारी नियुक्त करावेत. -मुंबईमध्ये बेस्टतर्फे सर्व विसर्जन ठिकाणं तसेच विसर्जन मार्गांवर पुरेशी वीज पुरवठ्याची व्यवस्था असावी. -दही हंडीच्या उत्सवात लहान गोविंदाबाबत (१४ वर्षांच्या आतील) न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे. -धर्मादाय आयुक्तांनी मंडळ नोंदणीसाठी ऑनलाईन व्यवस्था असावी. -गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांवरील ध्वनी प्रदूषण तसेच इतर काही लहान गुन्हे नोंदवले गेले असतील, ते व्यवस्थित तपासून काढून टाकण्यासंदर्भात पोलिसांनी कार्यवाही करावी. शिंदे आणि फडणवीस सरकारने गणेशोत्सव आणि दहीहंडीवरील निर्बंध हटवल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे या वर्षी नागरिकांना उत्साहात गणेशोत्सव आणि दहीहंडी साजरा करण्यात येणार आहे. यासाठी एसटी प्रशासनाला जादा गाड्या सोडण्याचे निर्देश देण्यात आले असूम परिवहन विभागास वाहतूक नियोजनाचे आदेश देण्यात आले आहे. प्रमुख महामार्गांवर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून महामार्ग पोलिसांना ही सूचना जाहीर करण्यात आली आहे. राज्यात दहिहंडी आणि गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरे होणार असल्याने नागरिकांमध्ये उत्सावाचं वातावरण आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.