गडचिरोली, 05 फेब्रुवारी : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी स्थापन केलेल्या भारत राष्ट्र समिती या पक्षामध्ये गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आदिवासी विद्यार्थी संघटनेचे माजी आमदार दीपक आत्राम यांचा प्रवेश निश्चित झाला असून आज नांदेड येथे हा पक्षप्रवेश होत आहे. दक्षिण भागात विधानसभेसह जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपंचायतीच्या राजकारणातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश होणार असल्याने जिल्ह्याच्या राजकारणात नवे समीकरणे उदयाला येण्याची शक्यता आहे.
के चंद्रशेखर राव यांची नांदेड इथं आज जाहीर सभा होत आहे. या जाहीर सभेपूर्वीच विदर्भातील तेलंगणाच्या सीमावरती जिल्ह्यातील काही मोठ्या नेत्यांच्या प्रवेशाचा मुद्दा चर्चेला आला आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणात आत्राम राजघराण्याला कडवे आव्हान देण्याचा प्रयत्न आदिवासी विद्यार्थी संघटनेने केला आहे. आदिवासी भागातल्या विद्यार्थ्यांच्या समस्यांवर स्थापन झालेल्या या संघटनेनंतर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मोठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
('जो उमदेपणा भाजपने दाखवला, तोच...' कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीसाठी राज ठाकरेंचं मविआला पत्र)
या संघटनेच्या माध्यमातून पुढे आलेले दीपक आत्राम हे विधानसभा निवडणुकीत अहेरी मतदार संघातून निवडून आले होते. त्यानंतर आदिवासी विद्यार्थी संघटनेने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये ही मोठ्या प्रमाणात लक्षणीय प्राप्त केले होते. या आदिवासी विद्यार्थी संघटनेचे नेते आणि दीपक आत्राम यांचे निकटवर्ती असलेले अजय कांकडालवार हे गडचिरोली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि नंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. काही ठिकाणी पंचायत समितीमध्येही आदिवासी विद्यार्थी संघटन सत्तेत आहे. तर गेल्या वर्षी झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीतही सिरोंचा सारख्या नगरपंचायतीमध्ये आदिवासी विद्यार्थी संघटनेने एक हाती सत्ता स्थापन केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून दीपक आत्राम यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अहेरी मतदारसंघात अमरीश आत्राम यांच्या पराभवानंतर भाजप नेतृत्व नव्या उमेदवाराच्या शोधा असल्याची चर्चा सुरू होती. त्यातूनच दीपक आत्राम यांचे नाव चर्चेत आले होते. त्याला स्थानिक भाजप नेत्यांनी विरोध दर्शवला होता. मात्र काही दिवसांपूर्वी अचानक दीपक आत्राम यांना तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव यांनी हैदराबादला बोलावले. त्या ठिकाणी दीपक आत्राम आणि के चंद्रशेखर यांच्यात दोन दिवस चर्चेच्या काही फेऱ्या झाल्या. त्यातून दीपक आत्राम यांचा पक्ष प्रवेश निश्चित झाला आहे.
येणाऱ्या काळात चंद्रपूर गडचिरोलीसह विदर्भाच्या पातळीवर दीपक आत्राम यांना चंद्रशेखरराव यांच्या बी आरएस पक्षाकडून मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
(पवारांशी बोलले, राज ठाकरेंशी बोलले, पण मुख्यमंत्री शिंदेंनी टाळला 'मातोश्री'वर फोन)
दरम्यान, जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष असलेले दीपक आत्राम यांचे सहकारी अजय कंकडालवार यांच्या बी आर एस पक्षात प्रदेशात संदर्भात अद्याप जाहीर करण्यात आलं नसलं तरी दीपक यात्रा यांच्या पाठोपाठ अजय कंकडालवार बीआरएस मध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
के चंद्रशेखरराव यांच्या सरकारने बनवलेल्या मेडीगट्टा कालेश्वर प्रकल्पाबद्दल सिरोंचा तालुक्यातील जनतेत नाराजी आहे. त्या प्रकल्पाच्या निर्मितीच्या वेळी के चंद्रशेखर राव यांच्या विरोधात दीपक आत्राम यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी के चंद्रशेखर यांच्या विरोधात ज्या भाषेत दीपक आत्राम यांनी वक्तव्य केले होते. ते व्हिडिओ काल सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.
मात्र, 'मेडिगड्डा कालेश्वर प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करत असताना के चंद्रशेखरराव यांच्या संदर्भात जी भाषा वापरली होती त्याची त्यांना भेटीदरम्यानच मी कल्पना दिलेली आहे तसंच मेडिगड्डा प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान के चंद्रशेखरराव यांच्या सरकारकडून मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्या संदर्भात केसीआर यांच्याशी तशी चर्चा झालेली आहे. केसीआर यांनीही मेडीगड्डा प्रकल्प बाधीतांना जेवढी मदत करता येईल तेवढी करण्याची हमी दिल्याची माहिती दीपक आत्राम यांनी न्यूज 18 लोकमशी बोलताना दिली आहे. एकूणच दीपक आत्राम यांच्या बीआरएस पक्षातील प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे कशी बदलतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.