मुंबई, 8 जानेवारी : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्या व्हिडीओमध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगजेबाचा उल्लेख औरंगजेबची असा केल्याचे दिसून येत होते. यावरून विरोधकांनी चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपाच्या कोंडीचा प्रयत्न केला. संजय राऊत यांनी तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करताना औरंगजेबाचं थेट गुजरात कनेक्शन जोडलं. मात्र यावर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बावनकुळे यांनी एक परिपत्रक काढत, यावर खुलासा केला आहे. बावनकुळे यांनी नेमकं काय म्हटलं? ‘जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी औरंगजेब कसा आहे, हे मी मांडले होते, त्यावर ‘सामना’ने मी औरंगजेबजी म्हटलो असं प्रसिद्ध केलं. क्रूरकर्मा, पापी औरंगजेब जितेंद्र आव्हाड यांना कसा ‘आदरणीय’, प्रिय, आपुलकीचा व श्रद्धास्थानी आहे हे सांगताना मी आव्हाडांसाठी औरंगजेब हा औरंगजेबजी आहे असं उपरोधाने म्हटलो होतो. मात्र उपरोधही समजू नये हे अनाकलनीय व दुर्दैवी आहे. औरंगजेबाला मी स्वप्ननातही ‘जी’ म्हणू शकत नाही हे पुन्हा सांगतो आणि आयुष्यभर सांगेन’ असं बावनकुळे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. हेही वाचा : मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे गटाचा वाद चव्हाट्यावर, संजय राऊतांचा शब्द खरा ठरला! सामनावर टीका दरम्यान त्यांनी यावेळी सामनावर देखील टीका केली आहे. ‘मी यापूर्वीच यावर स्पष्टीकरण दिलं आहे. सामना बहिरा आणि आंधळा झाला आहे. हे आता सांगायचीही गरज नाही. सामनाचे अंतरंग व बाह्यरंग हिरवे झाले आहे. त्यांनी भगवा रंग काढून टाकावा’ असं बावनकुळे यांनी या पत्रात म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







