नवी दिल्ली 20 ऑक्टोबर : यंदा दिवाळीत फटाके फोडणं दिल्लीतील लोकांना चांगलंच महागात पडणार आहे. दिल्लीत फटाके फोडल्यास 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवास आणि 200 रुपयांचा दंड होऊ शकतो, असं पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी बुधवारी सांगितलं. यासोबतच स्फोटक कायद्याच्या कलम 9B अंतर्गत राजधानीत फटाक्यांचं उत्पादन, साठवणूक आणि विक्री केल्यास 5,000 रुपयांपर्यंतचा दंड आणि तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. त्याचबरोबर मुंबईतही विना परवाना फटाके विक्रीवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. सावधान! दिवाळीआधी नागपुरात मोठी कारवाई, 20 लाख किमतीचे भेसळयुक्त पदार्थ जप्त राय म्हणाले की, दिल्ली सरकारने सप्टेंबरमध्ये 1 जानेवारीपर्यंत सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या उत्पादन, विक्री आणि वापरावर पूर्णपणे बंदी घातली आहे. दिवाळीचा सणही याच काळात येतो. गेल्या दोन वर्षांपासून हे काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. 21 ऑक्टोबरपासून दिल्लीत ‘दीये जलाओ पटाखे नहीं’ ही जनजागृती मोहीम सुरू होणार आहे. राय म्हणाले की, दिल्ली सरकार शुक्रवारी कॅनॉट प्लेसच्या सेंट्रल पार्कमध्ये 51,000 दिवे प्रज्वलित करेल. यासह, दिल्लीत फटाके खरेदी आणि फोडल्यास 200 रुपये दंड आणि भारतीय दंड संहितेनुसार सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
महाराष्ट्रातही हे नियम - फटक्यांमुळे हवेचं प्रदुषण होत असतं. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून डेसिबलची मर्यादा घालून दिली जाते. यावर्षी देखील १२५ डेसिबलची मर्यादा घालून देण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नियमाचं पालन व्हावं म्हणून कडक तपासणी सुरु झाली आहे. बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या २२ प्रकारच्या फटाक्यांची एमपीसीबीकडून उल्हासनगरच्या सेंच्युरी मैदानात चाचणी घेण्यात आली आहे. यात एक हजार, पाच हजारांच्या माळा, सुतळी बॉम्ब, आकाशात जाऊन फुटणारे फटाके यांची डेसिबल मीटरवर चाचणी झाली. या चाचणीचा अहवाल लवकरच महापालिका आणि पोलिसांना सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर जास्त आवाजाच्या फटाक्यांवर बंदी बंदी घालण्याच्या सूचना देण्यात येतील अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी उपेंद्र कुलकर्णी यांनी दिली. मुंबईत परवानगीशिवाय फटाके विक्रीवर बंदी घालण्यासाठी परवाना नसलेल्या फटाका विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल, असंही मुंबई पोलिसांनी बुधवारी स्पष्ट केलं.