धाराशिव, 6 जून : नाशिकनंतर आता धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून देखील भाजप व शिवसेनेत वादाची ठिणगी पडली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपाचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी धाराशिवची जागा भाजप लढवणार असल्याचा दावा केला होता. राणा जगजीत सिंह पाटील यांच्या या दाव्याला आता तानाजी सावंत यांनी आपल्या खास शैलीमध्ये प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनेचे स्वतंत्र अस्तित्व आहे, आम्हाला सहज घेऊ नका असा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी भाजपाला दिला आहे. नेमकं काय म्हणाले सावंत? शिवसेनेचं स्वतंत्र अस्तित्व आहे, आम्हाला सहज घेऊ नका असा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी भाजपाला दिला आहे. यापूर्वी लोकसभेला लढलेल्या 23 च्या 23 जागा शिवसेना लढवणार असल्याचा दावाही आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी केला आहे. लोकसभेच्या जागेवरून भाजपाकडून केल्या गेलेल्या वेगवेगळ्या वक्तव्यांना आज सावंत यांनी आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिलं. धाराशिव मतदारसंघावर दावा धाराशिव लोकसभेची जागा ही शिवसेनाच लढवणार असल्याचंही सावंत यांनी म्हटलं आहे. काही दिवसापूर्वी भाजपाचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी धाराशिवची जागा भाजपा लढवणार असल्याचा दावा केला होता. सावंत यांनी आज त्याला प्रत्युत्तर देत धाराशिवची जागा शिवसेना लढवणार असल्याचं सांगितलं आहे. सावंत यांच्या या दाव्यामुळे भविष्यात लोकसभेच्या जागा वाटपावरून शिवसेना व भाजप यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडण्याची चिन्ह आहेत. नाशिकमध्येही वाद दुसरीकडे नाशिकमध्ये देखील भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून लोकसभेच्या जागेवर दावा करण्यात आला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत विद्यमान शिवसेना खासदारावर या भाजप इच्छुकानं जोरदार हल्लाबोल केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.