मुंबई, 16 मार्च : एका गुन्हेगारी प्रकरणातून वडिलांना बाहेर काढण्यासाठी एका डिझायनरनं थेट राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 1 कोटी रुपये ऑफर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुंबईतील मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये अमृता फडणवीस यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी 20 फेब्रुवारी 2023 रोजी अनिक्षा नावाची डिझायनर आणि तिच्या वडिलांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 120 (बी) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 च्या कलम 8 आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? दरम्यान या सर्व प्रकरणावर आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. या प्रकरणात अमृता फडणवीस यांच्यावर दबाव आणला गेल्याचा दावा त्यांनी केला आहे. अनिल जयसिंघानी हा व्यक्ती फरार आहे. त्याची मुलगी 2015-2016 मध्ये अमृता फडणवीस यांना भेटली होती. त्यानंतर पुन्हा 2021 मध्ये त्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. डिझायनर असल्याचं सांगून तिने अमृता फडणवीस यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर आई वारल्याचं सांगून पुस्तक प्रकाशन करून घेतले असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. विश्वास संपादन केला पुढे बोलताना फडणवीस यांनी म्हटलं की, या मुलीने विश्वास संपादन करून डिझायनर कपडे परिधान करण्यास दिले. त्यानंतर वडिलांना काही चुकीच्या प्रकरणात अडकवण्यात आल्याचा दावा या मुलीने केला, तसेच अमृता फडणवीस यांना निवेदन देण्यास सांगण्यात आले. त्यानंतर काही बुकींना आपण ओळख असल्याचंही या मुलीने सांगितलं. या प्रकरणात अमृता यांनी दुर्लक्ष केलं, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
डिझायनरने दिली एक कोटीच्या लाचेची ऑफर, अमृता फडणवीस यांची पोलिसांकडे तक्रारएक कोटीचं आमिष पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, या मुलीने वडिलांना सोडविण्यासाठी अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपये देण्याचं आमिष दाखवलं. मात्र त्यानंतर चुकीच्या प्रकरणात मदत करणार नसल्याचं अमृता फडणवीस यांनी या मुलीला स्पष्ट सांगितलं व तिचा नंबर ब्लॉक केला. नंबर ब्लॉग केल्यानंतर अज्ञात नंबर वरून व्हिडीओ पाठवण्यात आले. ज्यामध्ये एका बॅगेत पैसे भरल्याचा व्हिडीओ व दुसरी बॅग घर काम करणाऱ्याला महिलेला दिल्याचा व्हिडीओ होता. ही बाब अमृता यांनी मला सांगितल्यानंतर याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी संबंधित आरोपीला जाळ्यात आडकवल्यानंतर त्याने या प्रकरणात काही पोलीस अधिकारी आणि नेत्यांची नावही घेतली असल्याचा दावा फडणवीसांनी केला आहे.

)







