मुंबई, 16 मार्च : एका गुन्हेगारी प्रकरणातून वडिलांना बाहेर काढण्यासाठी एका डिझायनरनं थेट राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 1 कोटी रुपये ऑफर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुंबईतील मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये अमृता फडणवीस यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी 20 फेब्रुवारी 2023 रोजी अनिक्षा नावाची डिझायनर आणि तिच्या वडिलांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 120 (बी) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 च्या कलम 8 आणि 12 अंतर्गत गुन्हा नोंदवलाय. ‘इंडियन एक्सप्रेस’ ने याबाबत वृत्त दिलंय. पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार, अनिक्षा 16 महिन्यांहून अधिक काळ अमृता फडणवीस यांच्या संपर्कात होती. तिनं फडणवीस यांच्या सरकारी निवासस्थानी म्हणजे मुंबईतील सागर बंगल्याला भेट दिली होती. पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत फडणवीस यांनी म्हटलं आहे की, ‘18 आणि 19 फेब्रुवारीला अनिक्षानं तिच्या व्हिडिओ क्लिप, व्हॉईस नोट्स आणि अनेक संदेश अज्ञात फोन नंबरवरून पाठवले. ती तिच्या वडिलांसोबत, अप्रत्यक्षपणे माझ्याविरुद्ध षडयंत्र रचत होती.’ फडणवीस यांनी दिलेल्या तक्रारीत आरोपी म्हणून अनिक्षाच नाव असून, अनिक्षाच्या वडिलांचा सहआरोपी म्हणून उल्लेख करण्यात आलाय. इंडियन एक्सप्रेसच्या प्रतिनिधीने हा एफआयआर पाहिला असून त्याने फडणवीस यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत उल्लेख केलेल्या क्रमांकावर अनिक्षाच्या वडिलांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु संबंधित क्रमांकावर अनेकदा कॉल केल्यानंतर तो कोणीही उचलला नाही. दुसरीकडे मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, या प्रकरणाचा तपास सुरू असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. जुन्या पेन्शनचा मुद्दा न्यायालयात; सदावर्तेंनी दाखल केली याचिका, दाव्यामुळे कर्मचारी अडचणीत? नेमकं काय घडलं? अमृता फडणवीस यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, ‘16 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 9.30 वाजता अनिक्षानं माझ्याशी संपर्क साधला आणि तिच्या (अनिक्षाच्या) वडिलांचं एका प्रकरणात आरोपी म्हणून नाव आलं असल्याचं सांगितलं. तसेच त्यांना वाचवण्यासाठी 1 कोटी रुपयांची ऑफर दिली. हे ऐकताच मी फोन कॉल डिस्कनेक्ट केला आणि तिचा नंबर ब्लॉक केला. पुढे, 18 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 11.55 ते मध्यरात्री 12.15 (19 फेब्रुवारी 2023) दरम्यान, मला 22 व्हिडिओ क्लिप, तीन व्हॉईस नोट्स आणि व्हॉट्सअॅपवर एका अनोळखी नंबरवरून अनेक संदेश आले. मला ज्या नंबरवरून व्हिडिओ क्लिप व मेसेज आले होते, त्याच मोबाईल नंबरवरून अशाच प्रकारच्या व्हिडिओक्लिप्स, व्हॉईस नोट्स आणि संदेश माझ्या कर्मचाऱ्यांना आले. त्यानंतर 19 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजता त्याच नंबरवरून सुमारे 40 संदेश, व्हिडिओ, व्हॉईस नोट्स आणि काही स्क्रीन शॉट्स मला पाठवण्यात आले. संबंधित नंबर अनिक्षाच्या वडिलांचा होता,’ असेही फडणवीस यांनी तक्रारीत म्हटलं आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये झाली होती भेट पोलिसांना दिलेल्या तक्रारीत फडणवीस यांनी म्हटलं आहे की, ‘अनिक्षाला नोव्हेंबर 2021 मध्ये पहिल्यांदा भेटले होते. तेव्हा तिनं सांगितलं होतं की, तिच्या आईचा मृत्यू झाला असून, आता तिलाच कुटुंबाचा सर्व खर्च करावा लागतो. अनिक्षानं सांगितलं होतं की, ती कपडे, दागिने, पादत्राणं आदींची डिझायनर आहे. अनिक्षानं मला तिनं डिझाईन केलेली कपडे, दागिने सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये घालण्याची विनंती केली, जेणेकरून त्याची जाहिरात करण्यास तिला मदत होईल. मलाही अनिक्षाबद्दल सहानुभूती वाटली आणि मी ठीक आहे म्हणाले. आमची ओळख झाल्यानंतर अनिक्षा एकतर तिच्या घरी किंवा मलबार हिल्समधील सागर बंगला येथे भेटत होती. तसेच ती मी उपस्थित असलेल्या सार्वजनिक कार्यक्रमांना सुद्धा हजेरी लावत होती. एकदा, तिनं आमच्या एका कर्मचार्याकडे काही डिझायनर कपडे आणि दागिने दिले, व मला ते सार्वजनिक कार्यक्रमात घालण्याची विनंती केली. तो ड्रेस मी एखाद्या कार्यक्रमात घातला होता की नाही, हे मला आठवत नाही. पण तिनं दिलेले कपडे व इतर साहित्य मी माझ्या कर्मचार्यांमार्फत तिला पाठवले होते,’ असेही तक्रारीमध्ये म्हंटले आहे. ‘एका मीटिंगमध्ये अनिक्षा हिनं सांगितलं होतं की, तिच्या वडिलांचे विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी जवळचे संबंध आहेत. नंतर तिनं माझ्या कर्मचाऱ्याला एक लखोटा (कागदी पाकीट) देऊन ते माझ्याकडे देण्यास सांगितलं. जेव्हा मी ते पाकीट उघडले, तेव्हा त्यात मला एक हस्तलिखित नोट सापडली. परंतु त्यामधील मजकूर मला समजला नाही, त्यामुळे मी तो कागद बाजूला ठेवला,’ असेही फडणवीस यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. पुण्यातील कार्यक्रमामध्येही आली होती अनिक्षा पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे की, ‘27 जानेवारी 2023 रोजी पुण्यातल्या एका कार्यक्रमात मला अनिक्षा भेटली. तेव्हा तिला पाहून मला आश्चर्य वाटलं. मी जेव्हा तिला याबद्दल विचारलं, तेव्हा तिनं मला सांगितलं की माझ्या एका कर्मचाऱ्यानं तिला कार्यक्रमाचा पास दिला होता. पुण्यावरून मुंबईला परतत असताना माझ्या अंगरक्षकानं गाडी थांबवली, तेव्हा मला अनिक्षा तिथं उभी असल्याचं दिसली. तिनं माझ्या कर्मचाऱ्यांना ‘मॅडमनं सांगितलं आहे की भेटायचं आहे,’ असं खोटं सांगितलं होतं. ती खोटं बोलत आहे, हे माहीत असूनही, मी तिला माझ्या गाडीत बसू दिलं, असेही तक्रारीत म्हटलं आहे. गाडीमध्ये अनिक्षानं अमृता फडणवीस यांना एक वेगळाच प्रस्ताव दिल्याचा दावा तक्रारीत केला आहे. अनिक्षाचे वडील पोलिसांना बुकींची माहिती देत होते. फडणवीस यांनी तक्रारीत असा दावा केला आहे की, ‘अनिक्षानं मला सांगितलं की, तिचे वडिल बुकींबद्दल माहिती देतील ती एकतर पोलिसांना देऊन कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना देऊन किंवा त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करून आपल्याला पैसे कमवता येतील. अनिक्षाने यात सहभागी होण्याचा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला होता.’ अनिक्षानं दिलेला प्रस्ताव ऐकून अमृता फडणवीस यांनी गाडी थांबवण्याची सूचना केली, व अनिक्षाला खाली उतरण्यास सांगितलं. त्यानंतर अनिक्षा त्यांच्या गाडीच्या मागे असणाऱ्या दुसऱ्या वाहनात बसली.’ दरम्यान, याबाबत अमृता फडणवीस यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. ऐन विधानसभेचे अधिवेशन चालू असताना हा सर्व प्रकार समोर आल्यामुळे त्याचे पडसाद सभागृहामध्ये उमटण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







