मुंबई, 17 फेब्रुवारी : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हा बाबत मोठा निर्णय दिला आहे. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे दोन्हीही एकनाथ शिंदे यांच्याकडे राहील असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. तसंच पक्षाची घटना ही लोकशाहीच्या विरोधात असल्याचं निरीक्षणही निवडणूक आयोगाने नोंदवलं आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री शिंदे यांचे अभिनंदन केले. फडणवीस म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे. मी एकनाथ शिंदेंचं मनापासून अभिनंदन करतो. मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच आहे. हेही वाचा : Shinde Vs Thackeray : नाव अन् चिन्ह दोन्ही शिंदेंना, पाच मुद्यांनी समजून घ्या आयोगाचा निर्णय बाळासाहेबांची शिवसेना पुढे नेण्याचं काम एकनाथ शिंदे करतायत. म्हणून कुणीही खाजगी मालमत्ता म्हणून शिवसेनेवर अधिकार गाजवू शकणार नाही. शिवसैनिक आणि बाळासाहेबांचा विचार ज्याच्याकडे आहे तीच खरी शिवसेना ठरणार आहे हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो. जो काही निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे त्यामुळे या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालंय असंही फडणवीस यांनी म्हटलं. आम्हाला विश्वास होता, शिंदेंना आत्मविश्वास होता कारण याआधीच्या सर्व निर्णयामध्ये निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या पक्षात अशी परिस्थिती उद्भवली तेव्हा असाच निर्णय दिला आहे. आमदार आणि खासदार यांची संख्याच लक्षात घेऊन निर्णय झाला आहे. पूर्ण निकाल वाचलेला नसल्यानं मी त्याचं विश्लेषण करणार नाही पण एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचं मनापासून अभिनंदन करतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. निवडणूक आयोगावर दबाव होता असा आरोप संजय राऊत यांनी केला. त्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पाच ते सात दिवसांपूर्वीच मी म्हटलं होतं की निर्णय त्यांच्या बाजूने आला की निष्पक्ष आणि विरोधात आला की दबाव असं म्हटलं जाईल. माझं स्पष्ट मत आहे की देशात न्याय, कायदा आणि संविधान आहे. त्याअंतर्गतच निर्णय झालाय. त्यांनी जरूर सर्वोच्च न्यायालयात जावं हा त्यांचा अधिकार असल्याचं म्हणत विरोधकांनी केलेल्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.