मुंबई, 21 जानेवारी : राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू असल्याने रोज नवी राजकीय घडामोड होताना दिसून येत आहे. दरम्यान शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह कोणाचे यावर काल सुनावणी झाली परंतु पुढची तारीख मिळाल्याने तुर्तासतरी राजकीय वातावरण शांत झाले असले तरी नवीन एक माहिती समोर आली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल(दि.20) शुक्रवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांची वर्षा या शासकिय बंगल्यावर भेट घेतली. दोन्ही नेत्यांच्या भेटी मागचं कारण अस्पष्ट असून पाऊण तास दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहीती मिळत आहे. या दोघांच्या झालेल्या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
हे ही वाचा : कोकणात लवकरच राजकीय भूकंप, धक्का शिंदेंना पण हादरे रामदास कदमांना!
केंद्रीय निवडणुक आयोगाकडे काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात ‘धनुष्यबाण’ या चिन्हा वरून सुनावनी झाली. न्यायालयाने निर्णय जरी राखून ठेवला असला, तरी उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्र्यांच्या भेटी दरम्यान या विषयावर चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पंतप्रधानांचा दौरा संपूण दुसरा दिवस उजाडत नाही तोच मुख्यमंत्री दिल्ली दौरा करणार होते. मात्र काही कारणास्तव हा देखील दौरा रद्द झाला आहे. अशातच उपमुख्यमंत्री रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
हे ही वाचा : Live update : ठाकरेंच्या पक्षप्रमुखपदाचा सस्पेन्स वाढला, निवडणूक आयोगाची सुनावणी संपली
दरम्यान या दोघांच्यात कोणत्या विषयावर चर्चा झाली आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. मंत्रीमंडळ विस्तार की शिवसेनेतील धनुष्यबाणावरून सुरू असलेला वाद यामध्ये काय चर्चा झाली याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
शिवसेना पक्ष, चिन्हावरील लढाई अंतिम टप्प्यात
शिवसेना पक्ष, चिन्हावरील लढाई अंतिम टप्प्यात आली आहे,आयोगासमोर दोन्ही गटांचा युक्तिवाद काल संपला आहे. लेखी स्वरूपात 30 जानेवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दोन्ही पक्षांना सूचना देण्यात आल्या आहेत. लेखी उत्तरानंतर निवडणूक आयोग निकाल देणार आहे. शिवसेना नेमकी कुणाची? ठाकरेंची की शिंदेंची? फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात निर्णयाची शक्यता आहे.