मुंबई, 01 जानेवारी : आता शिवसेनेचे आदेश मातोश्रीवरून निघत नाही तर दिल्लीतल्या मातोश्रींचे आदेश मानावे लागतात अशा शब्दात भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. पालघमध्ये आयोजित जिल्हा परिषदेच्या प्रचारावेळी ते बोलत होते. जनतेशी बेईमानी केलेलं हे सरकार काही झालं तर जास्त वेळ टिकणार नाही असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी बोलताना फडणवीसांनी शिवसेनेवर जहरी टीका केली आहे. शिवसेना ही सकाळी शेर आणि संध्याकाळी ढेर होते असंही ते म्हणाले. ते म्हणाले की, ‘शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे वचन उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिलं होतं. पण शिवसेनेचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जीवावर करणार असं वचन दिलं होत का? शिवसेनेच्या या वागण्यामुळे बाळासाहेबांना स्वर्गात खूप वाईट वाटत असेल. हिंदुत्ववादी शिवसेनेची आता काय अवस्था झाली आहे हे सगळ्यांना माहित आहे’ अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे - महाराष्ट्राच्या जनतेने प्रचंड बुहमताने आम्हाला विजयी केलं पण आम्हाला सत्तेबाहेर बसण्याची वेळी आली - आमच्या पक्षाने 70 टक्के जागांवर मिळवला. जनतेने दोघांना एकत्रित जनादेश दिला पण शिवसेनेनं जनादेशाचा अपमान केला. - 70 टक्के मार्क मिळालेला विद्यार्थी, वर्गात पहिला आला पण तरी सत्तेबाहेर बसावं लागलं आणि 40 टक्के घेणारे 3 विद्यार्थी सत्तेत बसले आहेत - पण काळजीचं कारण नाही. बेईमानी करणार हे सरकार फार काळ चालू शकणार नाही - सरकार तयार झाल्यानंतर 1 महिना उलटला तरी मंत्र्यांचा निर्णय झाला नाही हे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा झालं. मंत्रिमंडळ झाल्यानंतर शिवसेनेचं काय झालं सगळ्यांनी पाहिलं. - शिवसैनिकांमध्ये अन्याय झाला, राष्ट्रवादीमध्ये एक आमदार राजीनामा देण्यासाठी निघाला तर काँग्रेसमध्ये एका आमदाराच्या कार्यकर्त्यांनी थेट कार्यालय फोडलं - जे मंत्रिमंडळ तयार करू शकत नाही ते राज्य काय चालवणार - सरकार बेईमानीने तयार झालं. शेतकऱ्यांना आश्वासन दिलं पण त्यांना एक नवा पैसा दिला नाही. या सरकारमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला. 25 हजार देतो म्हणाले आणि भोपाळा दिला. - आणखी पैसे आम्ही मोदींकडे मागीतले असं म्हणतात पण सरकार बनवताना मोदींची आठवण आली नाही का? मोदीसाहेब मदत करतील पण तुमच्या मनगटात जोर पाहिजे ना. - मासेमारी करणाऱ्या समाजाला या सरकारने मदत दिली नाही - मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करीन तेही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जीवावर करीन असं वचन बाळासाहेब ठाकरेंना दिलं होतं का? - शिवसेना सकाळी शेर आहे संध्याकाळी ढेर आहे - आता शिवसेनेचे आदेश मातोश्रीवरून निघत नाही दिल्लीच्या मातोश्रींचे आदेश मानावे लागतात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.