मुंबई, 26 नोव्हेंबर : देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या अजित पवारांनी राजीनामा दिला आणि त्यांचं औटघटकेचं उपमुख्यमंत्रिपद संपुष्टात आलं. शनिवारी हा शपथविधी झाल्यानंतर महाराष्ट्रात मोठं राजकीय नाट्य घडलं. सुप्रीम कोर्टाने उद्याच खुल्या पद्धतीने बहुमत चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर बाजी पलटली. आम्ही आजच बहुमत सिद्ध करू, असा दावा भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी ट्विटरवरून केला आणि त्यानंतर नेमकं बहुमत कुणाकडे आहे याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. असं असलं तरी विश्वासदर्शक ठरावापूर्वीच अजित पवारांनी राजीनामा दिला आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही राजीनामा देण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या भरवशावर देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून 54 आमदारांच्या सह्यांचं पत्र दिलं. पण या पत्राला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्षेप घेतला. हे पत्र राष्ट्रवादीची अंतर्गत बाब होती, त्यात कुठेही भाजपला पाठिंबा देण्याचा उल्लेख नव्हता हेही त्यांनी सांगितलं. (हेही वाचा : देवेंद्र फडणवीस देणार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा?, 3:30 वाजता जाहीर करणार निर्णय) बहुमत चाचणीसाठीची ही लढाई सुप्रीम कोर्टात गेली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी तातडीने बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली. यावर कोर्टाने बहुमत चाचणी उद्याच घ्या आणि खुल्या पद्धतीने घ्या, असा निर्णय दिला. कोर्टाच्या या निकालानंतर मात्र देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची बहुमत चाचणीला सामोरं जाण्याची तयारी दिसली नाही. मुंबईत ग्रँड हयात मध्ये झालेल्या ओळख परेडमध्ये महाविकास आघाडीने आम्ही 162 असा दावा केला आणि त्यानंतर भाजप बहुमत कसं मिळवणार असा सवाल निर्माण झाला. अखेर अजित पवारांनी आपला उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि या नाट्यावर पडदा पडला. =======================================================================================
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







