रावसाहेब दानवेंची जीभ छाटण्याची सुपारी देणाऱ्या शिवसैनिकाविरुद्ध भाजप आक्रमक

रावसाहेब दानवेंची जीभ छाटण्याची सुपारी देणाऱ्या शिवसैनिकाविरुद्ध भाजप आक्रमक

ऐन थंडीच्या दिवसात राज्यातील राजकारण तापलं आहे.

  • Share this:

जालना, 14 डिसेंबर: 'शेतकऱ्यांचा वारंवार अपमान करणारे केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे (BJP Leader Raosahev Danave) यांची जीभ छाटणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस आणि लोकवर्गणीतून मिळालेली चारचाकी वाहन देऊ', अशी घोषणा यवतमाळ शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख संतोष ढवळे (Shiv Sena Leader Santosh Dhavale) यांनी केली होती. यावरून ऐन थंडीच्या दिवसात राज्यातील राजकारण तापलं आहे.

संतोष ढवळे यांची ही घोषणा लोकशाही विरोधी असून ढवळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करा,अशी तक्रार भाजप युवा मोर्चाच्या वतीने जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

हेही वाचा...मराठा आंदोलन दडपलं तर सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील, राणेंचा इशारा

रावसाहेब दानवे यांच्या विरोधात देण्यात आलेल्या या सुपारीचा आपण निषेध करत असून शिवसेनेने देखील ढवळे यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे तुलजेश भुरेवाल यांनी पोलिसांकडे लेखी तक्रारीच्या माध्यमातून केली आहे.

शिवसैनिकानं दिली ऑफर

शिवसेना माजी जिल्हाप्रमुख संतोष ढवळे यांच्या नेतृत्त्वात रविवारी यवतमाळ शहरात इंधन दरवाढ आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या शेतकरी विरोधी वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी संतोष ढवळे यांनी सांगितलं की, रावसाहेब दानवे हे शेतकरी विरोधी नेते आहेत. ते शेतकऱ्यांचा वारंवार अपमान करतात. दानवे यांची जीभ छाटणाऱ्यास 10 लाख रुपये बक्षीस आणि लोकवर्गणीतून मिळालेले चारचाकी वाहन भेट देण्यात येईल, अशी घोषणा देखील संतोष ढवळे यांनी केली. त्यामुळे भाजप आणि शिवसेना पुन्हा आमने-सामने आले आहेत.

शिवसैनिक आणि पोलिसांत बाचाबाची..

यवतमाळ शहरातील दत्त चौकात रविवारी झालेल्या या आंदोलनादरम्यान शिवसैनिक आणि पोलिसांत बाचाबाची झाली. शिवसैनिकांनी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. एवढंच नाही तर त्यांच्या पुतळ्याला चपला मारल्या. नंतर दानवेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी शिवसैनिकांना अडवल्यानंतर त्यांनी हुज्जत घातली.

दरम्यान, सर्व देशभर शेतकर्‍यांच्या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळत असताना रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना पाकिस्तान आणि चीनमधून मदत मिळत असल्याचं म्हटलं होतं. रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला असल्याची टोकेची झोड देखील उठली आहे.

हेही वाचा...पुण्यात पोलिसांची कारवाई, घोड्यांच्या शर्यतीवर बेटिंग घेणार्‍या 31 जणांना अटक

नेमकं काय म्हणाले रावसाहेब दानवे?

कृषी बिल रद्द करावं की नाही यावरून सुरू असलेल्या राजकीय वादात आता रावसाहेब दानवेंनी अजब वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली.

राजधानी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. सुधारित नागरिकत्व कायदा आणि NRC च्या माध्यमातून आधी मुस्लिम बांधवांची दिशाभूल केली. पण ते प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. नव्या कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होईल, असं सांगून त्यांचे कान भरण्याचं काम सुरू असल्याचा गंभीर आरोप दानवेंनी केला आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: December 14, 2020, 5:39 PM IST

ताज्या बातम्या