आनिस शेख, प्रतिनिधी देहू, 19 मे : श्रीक्षेत्र देहू येथे इंद्रायणी नदी पात्रात हात पाय तसंच डोक्याला दगड बांधलेल्या अवस्थेत एक अनोळखी मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली होती. अखेर या प्रकरणाचा छडा लावण्यात देहूरोड पोलिसांना यश आले आहे. अवघ्या चार तासातच गुन्ह्याचे गुढ उकलून पोलिसांनी चार मारेकऱ्यांपैकी तिघांना अटक केली आली असून अद्याप एक जण फरार आहे. देहू येथील मोकळ्या माळरानावर हाताला मिळेल ते काम करणाऱ्या मजुरांची संख्या मोठी आहे. त्यातच रामभाऊ कुंभार यांच्या मालकीच्या मोकळ्या जागेत मागील काही महिन्यापासून पाच मजुरी करणारे मजूर कामगार राहत होते. त्यापैकी सुनील मरजकोले या 35 वर्षीय तरुणाला दारूचे व्यसन होते. दारू प्यायल्यानंतर तो आपल्यासोबत असलेल्या इतर चार मित्रांसोबत भांडणं करून त्यांना त्रास देत होता. दररोज दारूच्या नशेत भांडणे होत असल्यामुळे त्याचे मित्र त्याला कंटाळले होते. त्यामुळे त्यांनी सुनीलचा काटा काढण्याचं ठरवलं होतं. हेही वाचा -
विक्रमी वाढीनंतर सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण, असे आहेत आजचे दर 15 मे रोजी सुनीलने पुन्हा भांडण करण्यास सुरुवात केली असता चारही मित्रांनी त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर बेल्टने गळा आवळून खून केला. त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी या चारही मित्रांनी त्याचा मृतदेह इंद्रायणी नदीपात्रात डोक्याला, हाताला मोठे दगड बांधून ढकलून दिला. परंतु, दोन दिवसानंतर सुनीलचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचं गावकऱ्यांच्या निदर्शनास आलं. त्यांनी तातडीने पोलिसांना याबद्दल माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेतला.
पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून तपासाची चक्रे वेगात फिरवली. गुन्हे शाखा युनिट 5 च्या पथकाने पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत सहाय्यक पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांच्या पथकाने अवघ्या चार तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्यात. या प्रकरणी अनिकेत उर्फ टायगर शिंदे, पवन बोरवले आणि महेंद्र माने या तिघांना अटक करण्यात आली असून त्यांचा एक साथीदार अद्याप फरार आहे. त्याचा शोध घेतला जात आहे. हेही वाचा -
वुहानमधली ‘ती’ स्पर्धा ठरली जगासाठी कोरोनाचा टाइम बॉम्ब, दिग्गज खेळाडूंचा खुलासा
या खून प्रकरणात कुठल्याही प्रकारचा सुगावा नसताना काही तांत्रिक बाबीच्या आधारे पोलिसांनी मोठ्या शिताफीने या खुनाचा छडा लावला. या तिन्ही आरोपींनी चौकशीत खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत. संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.