विदर्भच नाही कोकण, मराठवाडाही डेंजर झोनमध्ये! कॅबिनेट बैठकीतल्या कोरोना रिपोर्टमध्ये उघड झाली धक्कादायक माहिती

विदर्भच नाही कोकण, मराठवाडाही डेंजर झोनमध्ये! कॅबिनेट बैठकीतल्या कोरोना रिपोर्टमध्ये उघड झाली धक्कादायक माहिती

सर्वाधिक लक्ष द्यावेत असे 5 जिल्हे विदर्भातले असले आणि रुग्णवाढ सर्वाधिक प्रमाणात याच विभागात झालेली असली तरी कोरोनामुळे मृत्यूचं थैमान वाढलं आहे कोकण आणि मराठवाड्यात.

  • Share this:

मुंबई, 24 फेब्रुवारी: महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये या महिन्यापासून अचानक वाढ व्हायला लागली आहे. नुसती रुग्णवाढ नव्हे तर कोरोना मृत्यूंचं प्रमाणही वाढत असल्याची धक्कादायक माहिती महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत सादर करण्यात आली. विदर्भातल्या दोन जिल्ह्यांमध्ये जेवढ्या रुग्णांची कोरोना चाचणी मागच्या आठवड्यात झाली, त्यातल्या 40 टक्क्यांहून अधिकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. राज्य सरकारने आता सर्वाधिक लक्ष देण्याची गरज असलेले 5 जिल्हे समोर आणले आहेत. त्याचबरोबर विदर्भच नव्हे तर कोकण आणि मराठवाड्यातही धोका वाढल्याचं कॅबिनेट बैठकीत सादर झालेल्या आकडेवारीतून स्पष्ट झालं.

सर्वाधिक लक्ष द्यावेत असे जिल्हे विदर्भातले असले आणि रुग्णवाढ सर्वाधिक प्रमाणात याच विभागात झालेली असली तरी कोरोनामुळे मृत्यूचं थैमान वाढलं आहे कोकण आणि मराठवाड्यात.

कोकण मराठवाडा डेंजर झोन

कोकण आणि मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाव्हायरसमुळे  झालेल्या मृत्यूंचं प्रमाण सर्वाधिक आहे. गेल्या आठवड्यात लातूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांमधला मृत्यूदर खूप जास्त वाढला आहे.

लातुरात झाले सर्वाधिक मृत्यू

एकीकडे रुग्णवाढीत विदर्भ पुढे असला तरी कोरोनाचं गंभीर स्वरूप मराठवाडा आणि कोकणात दिसत आहे. लातूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यात रुग्णांचा मृत्यूदर 4 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. 15 फेब्रुवारीनंतर सर्वाधिक मृत्यूदर लातूर जिल्ह्यात 4.39 टक्क्यांवर झालेला दिसतो.

साप्ताहिक रुग्णवाढीचा दर सर्वाधिक असलेले जिल्हे

अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यात सर्वाधिक रुग्णवाढ झाली. 15 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी या काळात विदर्भातल्या या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा कहर झाल्याचं या आकडेवारीवरून स्पष्ट होईल. राज्य सरकारने लक्ष द्यावे अशा जिल्ह्यांच्या यादीत या पाच जिल्ह्यांचा समावेश केला आहे.

8807 रुग्ण, 80 मृत्यू; 2021 मधली महाराष्ट्राची कोरोनाची धक्कादायक आकडेवारी

चाचण्यांच्या प्रमाणात पॉझिटिव्ह रिपोर्ट येण्याचं प्रमाणही विदर्भात अधिक आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या कोरोना चाचण्यांपैकी अमरावतीत 41.58 जणांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं. हा पॉझिटिव्हिटी रेट हादरवणारा आहे. त्या खालोखाल अकोला जिल्ह्यात 30.86 टक्के पॉझिटिव्हिटी रेट दिसून आला.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: February 24, 2021, 9:29 PM IST

ताज्या बातम्या