मुंबई, 24 फेब्रुवारी : राज्यातील कोरोनाची परिस्थिती (coronavirus in maharashtra) किती भीषण झाली आहे, याची धक्कादायक आकडेवारी आता समोर आली आहे. 23 फेब्रुवारीपर्यंत 6 हजारांच्या आत असलेल्या नव्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनं आज मात्र 8 हजारांचा आकडा पार केला आहे. ही आकडेवारी पाहूनच काळजात धस्सं होईल.
राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाचा उद्रेक झाला आहे. राज्यातील कोरोनाचा भयावह चेहरा आता समोर आला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात आज 8,807 नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर 80 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर आता 2.45 टक्के आहे.
राज्यात आज 8807 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 2772 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2008623 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 59358 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.70% झाले आहे.#CoronaVirusUpdates
राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 20,08,623 झाली आहे. त्यापैकी 59,358 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (Recovery Rate) 94.70% आहे.
मुंबई, पुणे, ठाणे, अमरावती, नागपूर, अकोला या जिल्ह्यांमध्ये कोरोना थैमान घालतो आहे. लॉकडाऊन शिथील केल्यानंतर नागरिक बेजबाबदारपणे वागत आहेत आणि यामुळे कोरोनाचा उद्रेक झाल्याचं सांगितलं जातं आहे. शिवाय महाराष्ट्रात कोरोनाचे दोन नवे स्ट्रेनही आहेत. पण यामुळे कोरोना झपाट्याने वाढतो आहे, असं म्हणण्यासाठी वैज्ञानिक पुरावा अद्याप सापडला नसल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे.
केंद्राची उच्चस्तरीय समिती राज्यात
देशातील सर्वाधिक कोरोना प्रकरणं महाराष्ट्र आणि केरळमध्ये आहेत. इथं 50,000 पेक्षा जास्त प्रकरणं म्हणजे जवळपास एकूण प्रकरणांच्या 75% प्रकरणं या दोन राज्यांत आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात 36.87% आणि केरळमध्ये 37.85% प्रकरणं आहेत. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मंगळवारी दिली.
त्यामुळे राज्यातील कोरोनाव्हायरला नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारनं धडपड सुरू केली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाला आवरण्यासाठी केंद्रानं उच्च स्तरीय मल्टीडिसिप्लिनरी टीम रवाना केली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील सहसचिव पातळीवरील अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात ही तीन सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. राज्यातील प्रशासनासोबत ही टीम काम करेल आणि कोरोना प्रकरणं का वाढत आहे, त्याची कारणं शोधेल. हे पथक राज्य सरकारला कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत करेल. आवश्यक ती पावलं उचलेल.
केंद्र सरकारनं दिला अॅक्शन प्लॅन
दरम्यान केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र सरकारला पत्रही लिहिलं आहे आणि आणि कोरोनाला नियंत्रित ठेवण्यासाठी अॅक्शन प्लॅन दिला आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आवश्यक ती कठोर पावलं उचलण्याचे आदेश दिले आहेत.
जास्तीत जास्त कोरोना टेस्ट करण्याच्या सूचना केल्या आहेत. कोरोनाप्रभावित जिल्ह्यांमध्ये आरटी-पीआर आणि रॅपिड अँटिजेन दोन्ही टेस्ट कराव्यात. लक्षणं असलेल्या ज्या रुग्णांची अँटिजेन टेस्ट निगेटिव्ह आली आहे, त्यांची आरटी-पीसीआर टेस्ट करणं अनिवार्य असल्याचंही केंद्रानं सांगितलं आहे. तसंच लसीकरणाचा वेग वाढवण्याचा सूचनाही देण्यात आल्या आहेत.