सांगली, 17 ऑक्टोबर: विवाह करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांसमोर आपल्या पत्नीला उभं करून त्यांची आर्थिक फसवणूक (Money Fraud) करणाऱ्या एका जोडप्याला अटक (Couple arrested) करण्यात आली आहे. संबंधित आरोपी जोडप्याने सांगली (Sangli) आणि सातारा (Satara) जिल्ह्यांत अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी दोन महिने आरोपींवर पाळत ठेवून त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. इस्लामपूर आणि सांगलीतील चार जणांची आरोपींनी फसवणूक केल्याची कबुली दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. अतुल धर्मराज जगताप (वय-42) आणि श्वेता अतुल जगताप (वय-36) अशी अटक केलेल्या आरोपी भामट्यांची नावं आहेत. याप्रकरणी वाळवा येथील एका तरुणाने ऑगस्ट महिन्यात आरोपींविरोधात फिर्याद दिली होती. अखेर दोन महिन्यांच्या तपासानंतर दोन्ही आरोपींना पोलिसांनी गजाआड केलं आहे. यावेळी पोलिसांनी आरोपी जोडप्याच्या अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेतलं आहे. आरोपी भामटे लग्नाळू मुलांना हेरून त्यांची आर्थिक फसणूक करत होते. त्यासाठी आधार कार्ड, मतदान कार्ड दाखवून विश्वास संपादन करत होते. हेही वाचा- दसऱ्याच्या दिवशीच साधला मुहूर्त; कामगाराने ज्वेलर्स शॉपमधील 1 कोटींचं लुटलं सोनं पीडित तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार, त्याचे कुटुंबीय त्याच्यासाठी एक मुलगी शोधत होते. त्यासाठी त्यांनी वर्तमान पत्रात एक जाहिरात दिली होती. ही जाहिरात पाहून आरोपीनं, पीडित तरुणाच्या नातेवाईकांना फोन केला आणि लग्नाबाबत विचारणा केली. यावेळी आरोपी अतुल जगताप याने आपण अरुण जाधव असल्याची खोटी माहिती दिली. यानंतर 8 जुलै रोजी साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये मुलगी पाहाण्याचा कार्यक्रम झाला. दोन्ही बाजूकडून लग्नासाठी होकार देण्यात आला. तसेच लग्नाची तारीख देखील ठरवण्यात आली. हेही वाचा- मोबाइल न दिल्याने पत्नीची सटकली; विळ्याने नवऱ्याचे ओठ कापून घेतला बदला मात्र दोनच दिवसात आरोपी श्वेता आणि अतुल यांनी फिर्यादी तरुणाच्या मोबाइलवर संपर्क साधून बस्ता खरेदी करण्यासाठी 30 हजार रुपये बँक खात्यावर पाठवा असं सांगितलं. फिर्यादी तरुणाने विश्वासाने तीस हजार रुपये आरोपींच्या खात्यावर जमा केले. दोन दिवसांनी फिर्यादी तरुणाने श्वेता आणि अतुल यांच्या मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, दोघांचे फोन स्विच ऑफ असल्याचे सांगितले. तसेच आरोपींनी दिलेला पत्ता देखील बनावट असल्याचं लक्षात आलं. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तरुणानं पोलिसांत तक्रार दाखल केली. हेही वाचा- कर्ज काढून मॅनेजरला दिले पैसे पण..; फसवणूक झाल्यानं तरुणानं उचललं टोकाचं पाऊल या प्रकरणी पोलिसांनी तपास करत अखेर दोन महिन्यांनी आरोपी दाम्पत्याला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी दाम्पत्या ज्या-ज्या ठिकाणी वास्तव्याला जात होते. तिथे भाड्याच्या खोलीत राहायचे त्यामुळे त्यांचा शोध घेण्यात अनेक अडचणी येत होत्या. आरोपींनी इस्लामपूर आणि सांगलीतील एकूण तरुणांची अशाच प्रकारे फसवणूक केल्याची कबुली दिली आहे. आरोपींकडे बनावट आधार कार्ड आणि मतदान कार्डदेखील आढळून आलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.