नवी मुंबई, 18 डिसेंबर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यातील निर्बंध हटवण्यात आले आणि सर्व सेवा, सुविधा, मॉल्स, शाळा, महाविद्यालये सुरू करण्यात आले. मात्र, आता विद्यार्थ्यांना कोरोनाचा (Coronavirus) संसर्ग होताना दिसत आहे. नवी मुंबईतील एकाच शाळेतील 16 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं वृत्त आलं आणि एकच खळबळ उडाली. त्यानंतर आज याच शाळेतील आणखी दोन विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. (18 students test positive for covid 19 in Navi Mumbai School)
नवी मुंबईत कोरोना बाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे. घणसोलीतील शाळेतील 18 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मागील 3 दिवसात 800 विद्यार्थ्यांच्या कोरोना चाचणीत 18 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. कतारहून आलेल्या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला मात्र त्यांचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह निघाला. हा मुलगा घरात न थांबता शाळेत गेल्याने इतर विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह झाले असल्याचे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
वाचा : Omicron डेल्टा व्हेरियंटपेक्षा 70 पट वेगाने पसरतो! फुफ्फुसांसाठी किती धोकादायक? जाणून घ्या
सर्व विद्यार्थ्यांना वाशी येथील कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. सर्वांची तब्बेत उत्तम आहे. आज पुन्हा नवी मुंबई महापालिकेच्या 3 टीम कोरोना चाचणी करण्यासाठी शाळेत आल्या आहेत. मात्र घाबरून विद्यार्थी शाळेत आले नाहीत. जे विद्यार्थी शाळेत आले नाहीत त्यांची घरोघरी जाऊन कोरोना चाचणी केली जाणार आहे.
राज्यात ओमायक्रोनचा शिरकाव
राज्यात कोरोनाचं संकट असताना कोरोनाच्या ओमायक्रोन या नव्या विषाणूने देखील शिरकाव केला आहे. हा नवा विषाणू युरोपमधील ब्रिटनसह अनेक देशांमध्ये थैमान घालत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. या विषाणूपासून बाधित असलेल्या रुग्णांची संख्या आता 40 वर पोहोचली आहे. महाराष्ट्र हे ओमायक्रॉनचे हॉट स्पॉट बनत असल्याचं या आकडेवारीवरून दिसून येत आहे. दरम्यान आरोग्य विभागाने जानेवारीमध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त केली असून, त्यानंतर जानेवारीमध्ये महाराष्ट्रात ओमायक्रॉनची नवी लाट येण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाबाबत निर्बंध वाढवण्यात आले आहेत.
इगतपुरीत 15 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील एका शाळेतील 15 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. शाळेतील 15 विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. इगतपुरीतील मुंढेगाव येथील आश्रमशाळेतील 15 विद्यार्थअयांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या आश्रमशाळेत तीनशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्याला काही दिवसांपूर्वी ताप आला होता. त्यांनंतर त्याची कोविड चाचणी केली. या कोविड चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर इतरही विद्यार्थ्यांची कोविड चाचणी करण्यात आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, School