मुंबई, 25 ऑगस्ट : कोरोनाच्या काळात संपूर्ण जगभरात लॉकडाऊन (Corona Lockdown) लावण्यात आला होता, त्यामुळे सर्वत्र मंदीचं संकट होतं, या परिस्थितीमध्येही राज्याची आर्थिक स्थिती व्यवस्थित ठेवल्याबद्दल कॅग रिपोर्टमध्ये (CAG Report) तत्कालिन अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं कौतुक करण्यात आलं आहे. कोरोनाचं संकट असताना राज्याचा जीडीपी कमी झाला असला तरीही वित्तीय तूट कमी करण्यात राज्य सरकारला यश आल्याचंही कॅग रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कॅगचा रिपोर्ट सादर करण्यात आला. राज्यावर 2016-17 साली 4 लाख कोटी रुपयांचं कर्ज होतं, हे कर्ज आता 5 लाख 48 हजार 176 कोटी रुपये एवढं झालं आहे. कोरोनाच्या काळात राज्याचा जीडीपी 3 टक्क्यांनी कमी झाला. लॉकडाऊनचा फटका उद्योग आणि सेवा क्षेत्रांना मोठ्या प्रमाणावर बसला, पण शेतीमुळे हा फटका कमी बसला. कृषी क्षेत्रात 13 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. तर जीएसटीमध्ये 15.32 टक्के आणि व्हॅटमध्ये 12.24 टक्क्यांची घट झाल्याचं कॅगच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. कॅगचा हा रिपोर्ट समोर आल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी तत्कालिन अर्थमंत्री आणि त्यांचे बंधू अजित पवार यांचं कौतुक केलं आहे. ‘कोरोना, लॉकडाऊन, मंदी अशा बिकट परिस्थितीत देखील राज्याचे अर्थखाते यशस्वीपणे सांभाळल्याबद्दल ‘कॅग’ने तत्कालिन अर्थमंत्री अजितदादा पवार यांचे आपल्या अहवालात कौतुक केले आहे. या काळात राज्याची राजकोषीय तूट कमी करण्यात सरकारला यश आले,’ असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
‘यामध्ये अजितदादांनी अतिशय मोलाची भूमिका बजावली. प्रशासनावरील पकड,उत्तम नियोजन आणि अभ्यास यांच्या जोरावर अजितदादांनी राज्याची आर्थिक बाजू यशस्वीपणे सांभाळली.याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. दादा, आम्हाला नेहमीच तुमचा अभिमान वाटतो,’ असं कौतुकही सुप्रिया सुळेंनी केलं.