'शेतकरी, सलून चालक, डबेवाल्यांनाही पॅकेज द्या!' काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

'शेतकरी, सलून चालक, डबेवाल्यांनाही पॅकेज द्या!' काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पटोले यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे. शेतकरी, सलून चालक, फुल विक्रेते, टॅक्सी चालक, मासळी विक्रेते, मुंबईचे डबेवाले आणि इतर काही छोटे व्यावसायिक यांनाही मदतीची गरज असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे.

  • Share this:

मुंबई, 15 एप्रिल : राज्य सरकारनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छोटे व्यावसायिक, गरीब यांच्यासाठी पॅकेज जाहीर केलं आहे. पण यासह आणखी काही घटकांचा या पॅकेजमध्ये समावेश करण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. पटोले यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना (CM Uddhav Thackeray) एक पत्र लिहिलं आहे. शेतकरी, सलून चालक, फुल विक्रेते, टॅक्सी चालक, मासळी विक्रेते, मुंबईचे डबेवाले आणि इतर काही छोटे व्यावसायिक यांनाही मदतीची गरज असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे.

पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्य सरकारनं कोरोनाची साखळी तोडण्यासाठी (Break the Chain) संचारबंदी घोषित केली आहे. त्याचं काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्वागत आहे. लोकांचे जीव वाचवणं ही आपली प्राथमिकता असून त्यासाठी काँग्रेस पक्ष खंबीरपणे सरकारबरोबर उभा आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत झालेल्या चर्चेनुसार संचारबंदी कालावधीसाठी छोट्या व्यावसायिकांकरिता पॅकेज जाहीर केले आहे, पण या पॅकेजमध्ये आणखी काही घटकांचा समावेश करणे गरजेचे असून त्यासाठी काँग्रेसची आग्रही भूमिका असल्याचं पटोले म्हणाले. त्यात शेतकरी, सलून चालक, फुल विक्रेते, टॅक्सी चालक, मासळी विक्रेते, मुंबईचे डबेवाले यांचा त्यांना आवर्जून उल्लेख केला आहे.

(हे वाचा - Remdesivir साठी पुणेकरांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन, पाहा PHOTOS)

संचारबंदीच्या कालावधीत भाजीपाला, फळबागायती व फुलांच्या शेती व्यवसायावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळं या शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे. तसंच सलूनचे दुकान बंद असल्याने या व्यावसायिकांचेही मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. धार्मिक स्थळांवर बंदी असल्यानं फुल विक्रेत्यांवरही उपासमारीची वेळ येईल. शिवाय मुंबईतील महत्वाचा घटक असलेल्या डबेवाल्यांचाही या पॅकेजमध्ये समावेश करून या घटकांना लाभ द्यावा, असे पटोले यांनी पत्रात म्हटले आहे.

(हे वाचा - कोरोना रुग्णांना काहीसा दिलासा, औषध कंपन्यांनी Remdesivir चे उत्पादन वाढवले)

राज्य सरकारनं संचारबंदीची घोषणा करताना, काही घटकांसाठी 1500 रुपयांची मदत जाहीर करत पॅकेजची घोषणा केली होती. मात्र त्यात आता समाजातील विविध वर्गांचा समावेश करण्याची मागणी काही पक्षांकडून केली जात आहे.

Published by: News18 Desk
First published: April 15, 2021, 2:26 PM IST

ताज्या बातम्या