नागपूर, 19 मे : सध्या जग कोरोनाशी लढा देत आहे. देशातही कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे हातावर पोट असलेल्या लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. भारताची उदयोन्मुख धावपटू प्राजक्ता गोडबोले आणि तिच्या कुटुंबालासुद्धा याची झळ बसली. वडील अर्धांगवायूच्या झटक्यामुळे अंथरुणावर पडून तर आईचंही काम बंद यामुळे कुटुंबाला एकवेळचं जेवण मिळणंही कठीण झालं होतं. याची माहिती मिळताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूरमधील शिवसैनिकांना कॉल केला आणि प्राजक्ताला मदतीसाठी सूचना दिल्या.
धावपटू असलेली प्राजक्ता नागपूरमधील सिरासपेठ इथं एका झोपडीमध्ये राहते. तिचे वडील हे सुरक्षारक्षकाचं काम करत होते. मात्र त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्यानं ते अंथरुणावरच पडून आहेत. प्राजक्ताची आई जेवण बनवण्याचं काम करून कुटुंब चालवत होती. मात्र आता तेसुद्धा काम बंद असल्यानं अडचण निर्माण झाली होती. कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती.
याबाबत प्राजक्ता म्हणाली की, या काळात आम्हाला शेजाऱ्यांकडून मिळणाऱ्या मदतीवर सर्व काही चालू आहे. ते आम्हाला जेवणासाठी तांदूळ, डाळ आणि काही वस्तू देत आहेत. त्यामुळे काही दिवसांची सोय होते पण नंतर काय. हा लॉकडाऊन अत्यंत वाईट वेळ घेऊन आला आहे. आमचं आयुष्यच उद्ध्वस्त झालंय.
दरम्यान या परिस्थितीत कोणाकडे मदत मागावी हे समजत नसल्याचंही प्राजक्ता म्हणाली. आई वडील हतबल असून लॉकडाऊन लवकर संपावा अशी प्रार्थना आम्ही करत असल्याचंही प्राजक्ताने म्हटलं आहे.
हे वाचा : वादळी पावसाने 4 महिन्यांच्या चिमुकलीचा घेतला जीव, 100 फुटांवर उडाला पाळणा
प्राजक्ताच्या परिस्थितीची माहिती होतातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नागपूरमधील पदाधिकाऱ्यांना फोन केला. त्यांना प्राजक्ताला मदत करण्याची सूचना दिली. तेव्हा काही दिवसांपूर्वी धान आणि पैशांची मदत तिला केली. शिवसेनेचे नागपूर शहर प्रमुख प्रकाश जाधव म्हणाले की, आम्ही तिच्या संपर्कात असून तिला शक्य तितकी मदत करू.
हे वाचा : आपला माणूस ! शेकडो किमी दूर अडकलेल्या लोकांची अंगावर शहारे आणणारी 'घरवापसी'
प्राजक्ताने इटलीत 2019 मध्ये झालेल्या जागतिक विद्यापीठ स्पर्धेत 5 हजार मीटर शर्यतीत भारतीय विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलं होतं. त्यात अंतिम फेरी गाठण्यात तिला अपयश आलं होतं. त्यानंतर यंदा तिनं टाटा स्टील भुवनेश्वर अर्ध मॅरेथॉनमध्ये दुसरं स्थान पटकावलं होतं.
पाहा VIDEO : लॉकडाऊनमध्ये जेवणावरून पत्नीशी भाडणं, पतीनं बिल्डिंगवरून मारली उडी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus