नवी दिल्ली, 19 मे : देशव्यापी लॉकडाउनमुळे राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात मानेसर आणि गुडगाव येथे गेल्या दोन महिन्यांपासून शेकडो मराठी कामगार अडकून पडले होते. हरियाणा सरकारमधील मराठी अधिकारी व नगररचना विभागाचे महासंचालक मकरंद खेतमलीश यांच्या पुढाकाराने सर्व कामगार आता आपल्या मुळगावी परतले आहेत. खेतमलीश यांनी स्वखर्चाने विशेष बसची व्यवस्था करीत तरूणांना घरी पोहचण्यात मदत केली.
मुळचे अहमदनगरचे असलेले मकरंद हे 2007 बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आहेत. महाराष्ट्रातील मराठी मजूर अडकून पडल्याची माहिती प्रकाश झोतात आल्यानंतर त्यांनी या कामगारांना स्वगृही परत पाठवण्याची जबाबदारी स्वीकारली.
गुडगावच्या महाराष्ट्र मंडळाचे सचिव शांताराम उदागे यांनी खेतमलीश यांच्याशी संपर्क साधून त्यांना कामगारांची यादी तसेच सविस्तर माहिती दिली. गेल्या 15 दिवसांपासून त्यांनी प्रशासकीय स्तरावर यंत्रणा कार्यान्वित केली होती. कोरोना संकटकाळात बांधकाम साईटवर काम करणाऱ्या मजुरांच्या जेवणाची व्यवस्था करण्याची महत्वाची जबाबदारी देखील खेतमलीश यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. गुडगावच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या समन्वयाने त्यांनी मराठी कामगारांना परत पाठवण्यासाठी हालचालींना वेग दिला.
महाराष्ट्र मंडळाच्या समन्वयाने सर्वांची आठवड्याभर पुरेल एवढे अन्नधान्य कामगारांना पुरवले. सर्वात मोठी अडचण परिवहन व्यवस्थेसंबंधी होती. सरकारी बसेस उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे त्यांनी खासगी बस संचालकांसोबत संपर्क साधला. कोरोनाच्या भितीमुळे अनेकांनी बसेस देण्यास नकार दिला. पंरतु, स्कुल बसेस त्यांना उपलब्ध झाल्या. चालक मात्र मिळत नव्हते. यातच जास्तीचे पैसे देवून चालकाला तयार करण्यात आले. बसचालकाची जुळवाजुळव करण्यातच तीन दिवस गेले. अखेर देणगी स्वरूपात पैसे एकत्रित करून मानेसर मधून 13 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता सर्व मराठी कामगारी महाराष्ट्रासाठी रवाना झाले.
हेही वाचा -लॉकडाउन 4.0 मध्ये नवे नियम नवीन बदल, रेड झोनमध्ये आता...
सर्वांची जेवण्याची व्यवस्था स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आली होती. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मानक कार्यप्रणालीनुसार (एसओपी) सर्व मुलांची वैद्यकीय पडताळणी करणे आवश्यक होते. गुडगावच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने प्राथमिकतेनं सर्वांची वैद्याकीय तपासणी करण्यात आली. 230 कामगारांना परत जाण्यासाठी सहा बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. प्रवासादरम्यान कुठलीही अडचण येवू नये यासाठी गुडगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील सर्वांसाठी तात्काळ प्रवास पासची व्यवस्था करून दिली.
संसर्गाची भीती तसेच लांबचा प्रवास असल्याने बसचालक मिळण्यास थोड्या अडचणी आल्या होत्या. सोनीपतमध्ये वास्तव्याला असलेल्या 28 सांगलीकरांना परत घरी पाठवण्याची व्यवस्था ही प्रशासनाकडून करण्यात आली होती. मानेसर, गुडगाव येथील मारूती कंपनीत हजारो मराठी तरूण कामाला आहे. लॉकडाउन दरम्यान शेकडो कामगारांचे करार संपल्याने ते अडकून पडले होते. हाती असलेले पैसे ही संपल्याने त्यांच्या जेवण्याचे हाल झाले होते. काहींनी सायकलने तर काहींनी पायदळ घरी जाण्याचा निर्णय घेतला होता.
हेही वाचा -शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सुचवले 8 महत्त्वाचे मुद्दे
वेळीच हरियाणा सरकारमध्ये कार्यरत नगरचे खेतमलीश यांनी तात्काळ सर्व यंत्रणा कामाला लावून कामगारांना स्वगृही परतण्याची व्यवस्था केली. मानेसर येथील पार्क मध्ये सर्व कामगारांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सर्वांच्या तपासणीनंतरच नाशिक रोडसाठी दोन बसेस तर नागपूरला तीन बसेला सोडण्यात आल्या. सर्व कामगार त्यांच्या घरापर्यंत सुखरूप पोहचले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र मंडळ, गुडगावचे सचिव शांताराम उदागे यांनी दिली.
नागपूर, नाशिक, नांदेड, लातूर, परभणी, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, अहमदनगर, धुळे, जळगाव तसेच विदर्भातील इतर जिल्ह्यातील हे सर्व कामगार होते. कामगारांना घरी पोहचवण्यासाठी गुडगाव नगररचना विभागाचे प्रमुख आर.एस.भाट, अमरावतीचे उपजिल्हाधिकारी डॉ. राजेश आडपवार,अमरावतीचे तहसीलदार संतोष काकडे, धुळ्याचे जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी, विष्णु पाटील, मनोज जाधव तसेच शिवसेनेचे पदाधिकारी ऋतुराज अग्रवाल यांनी मदत केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.