नवी दिल्ली, 5 डिसेंबर : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी तसंच भाजप नेत्यांची छत्रपती शिवाजी महाराजांबाबतची वादग्रस्त वक्तव्य आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेविरोधात महाविकासआघाडी आक्रमक झाली आहे. महाराष्ट्राच्या अपमानाविरोधात महाविकासआघाडी 17 डिसेंबरला मुंबईत जिजामाता उद्यान ते आझाद मैदान मोर्चा काढणार आहे. उद्धव ठाकरेंच्या या इशाऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्लीत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-20 बाबत बैठक बोलावली होती, या बैठकीला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. या बैठकीला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनाही आमंत्रण होतं, पण या दोन्ही नेत्यांनी या बैठकीला दांडी मारली, यावरूनही एकनाथ शिंदेंनी निशाणा साधला.
'जी-20 बाबत बैठक होती हे देशासाठी भूषणावह आहे. या बैठकीला देशातील अनेक मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि अनेक पक्षांचे अध्यक्ष उपस्थित होते. हा देशवासीयांचा कार्यक्रम आहे. महाराष्ट्रात 14 समिट बैठका होणार आहेत, यामुळे महाराष्ट्र राज्याचं ब्रॅण्डिंग होणार आहे, मी बैठकीला उपस्थित होतो, त्या बैठकीत सादरीकरण करण्यात आलं,' अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
'...तर मी सरकार चालवतो', उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना थेट चॅलेंज!
उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
'निमंत्रण सगळ्यांनाच गेलं होतं. देशप्रेम, विकासासारख्या अनेक गोष्टी यामध्ये आहेत. बैठकीला अनुपस्थित राहून त्यांना काय दाखवायचं होतं? हेच देशप्रेम आहे का? हेच राज्याचं प्रेम आहे का?', असा सवाल एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना विचारला.
'आम्ही मुख्यमंत्री झाल्यावर आता काही लोक घराबाहेर येत आहेत. बेळगावच्या बाबतीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भूमिका जाहीर केली आहे. बेळगाव मध्येच काय देशाच्या कुठल्याही भागात कोणी कोणाला रोखू शकत नाही. आमचे मंत्री मराठा बांधवांच्या पाठीशी उभे राहतील. आम्हाला कोणी आक्रमकपणा आणि धाडस शिकवू नये. ते विराट मोर्चा काढत आहेत, त्यांना शुभेच्छा आहेत. आजच्या महत्त्वाच्या बैठकीला ते गैरहजर होते, यावरून त्यांचं प्रेम दिसतं,' असा टोला मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना लगावला.
'चार-पाच महिन्यांमध्ये आम्ही जे निर्णय घेतले त्यामुळे काही जणांना धडकी भरली आहे. आरोपांना उत्तर द्यायला आम्ही रिकामे नाही,' असा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
उद्धव ठाकरेंचे दोन आमदार एसीबीच्या रडारवर, एकाची साडेचार तास चौकशी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Uddhav Thackeray