उदय जाधव, प्रतिनिधी मुंबई, 16 जुलै : महाराष्ट्र सरकारच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरूवात होणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. अजित पवार सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतरचं सरकारचं हे पहिलंच अधिवेशन असणार आहे. अधिवेशनाच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फटकेबाजी केली आहे. ‘अजितदादा पहाटे काम सुरू करतात, मी रात्री उशिरापर्यंत काम करतो तर फडणवीस ऑलराऊंडर आहेत. ते बॉलिंग बॅटिंग फिल्डिंग चांगली करतात. आधी आम्ही दोघं होतो, आता दादाही आलेत, त्यामुळे काम आणखी जोमाने होईल,’ अशी टोलेबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. अधिवेशनाच्या एक दिवस आधी शिवसेनेत इनकमिंग, बड्या नेत्याचा पक्ष प्रवेश! ‘आज अमरावतीमध्ये टेक्सटाईल प्रकल्पाचं अनावरण झालं. इतर राज्यांमधून या प्रकल्पाची मागणी झाली, पण आपल्या त्यावेळच्या सरकारने रस दाखवला नाही. देवेंद्रजींनी पत्र लिहून प्रकल्प मोदींकडे मागितला. देवेंद्र फडणवीस विरोधात असताना त्यांनी ममत्व दाखवलं आणि काही लोक प्रकल्प पळवल्याची भाषा करतात. एका वर्षात पुन्हा आपण नंबर एकला आलो आहोत. आधी गुजरात होतं, त्यावेळी अनेक प्रकल्प बंद पडले होते, पण आमच्या सरकारने ते पुन्हा सुरू केले,’ असं मुख्यमंत्री म्हणाले. ‘डाओसला आम्ही आणखी करार करून प्रकल्प आणले, सरकार चांगलं काम करतंय. बुलेट ट्रेन प्रकल्प थांबलेला सुरू केला. नमो शेतकरी योजना मदत केंद्र आणि राज्य सरकारने जाहीर केली. शेतकरी पिक वीमा योजना, लेक लाडकी योजना, महिला सक्षमीकरण, महिलांना एसटीमध्ये 50 टक्के आरक्षण, ज्येष्ठांना मोफत प्रवास, 75 हजार नोकऱ्या आम्ही देत आहोत,’ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ‘आम्ही फक्त आमच्या कुटुंबाची जबाबदारी घेत नाही, आम्ही जनतेच्या कुटुंबाची जबाबदारीही घेतो. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला. ज्यांना चांगलं काम करताना त्रास होईल, त्यांना आम्ही बाळासाहेब ठाकरे दवाखान्यात नेऊ. सकाळचा भोंगा कमी दाखवा, शासन आपल्या दारी ही योजना आपण दाखवत आहात,’ असा निशाणाही मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर साधला. ‘विरोधी पक्ष आहे कुठे?’, अधिवेशनाआधी मुख्यमंत्र्यांनी डिवचलं
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.