मुंबई, 27 जुलै : एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेना (Shivsena) सध्या ठाकरे गट आणि शिंदे गटात विभागली गेली आहे. शिवसेनेचे 55 पैकी 40 आमदार आणि 19 पैकी 12 खासदार यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. आमदार खासदारच नाही तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनाही आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. याचाच भाग म्हणून ते शिवसेनेच्या वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. एकनाथ शिंदे यांनी कालच बाळासाहेब ठाकरेंच्या सून स्मिता ठाकरे (Smita Thackeray) यांची भेट घेतली. या भेटीचं नेमकं कारण अजून गुलदस्त्यातच आहे. शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया दरम्यान एकनाथ शिंदे आणि स्मिता ठाकरे यांच्या भेटीवर शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. प्रत्येकाला भेटीचं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे, पण त्या बाळासाहेब ठाकरे यांच्या सून आहेत, हे लक्षात ठेवून पुढे वागावं, असं शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) म्हणाल्या आहेत. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना माजी मुख्यमंत्री असा उल्लेख केला आहे. शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख टाळला आहे, यावरही नीलम गोऱ्हे बोलल्या. त्यांना काय लिहायचं ते लिहू द्या, शेवटी उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महत्त्वाचं आहे. आम्ही उद्धव साहेबांसोबत पक्ष वाढवणार. काही जण टीकेची फुलं वाहतात, त्यात निवडुंगाची फुलं आहेत. आजच्या वाढदिवसाला ऐतिहासिक महत्त्व आहे. सोबत कोण आहे, हे समजेल, असं वक्तव्य गोऱ्हे यांनी केलं. तुळजाभवानीला चांदीची पावलं देईन म्हणून नवस बोलले होते. आज उद्धव साहेब आणि रश्मी वहिनी यांना ही पावलं दाखवली, त्यांनी नमस्कार केला. उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाली, ते उत्साही दिसले, असं नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं. महाराष्ट्रामध्ये आज महिला अत्याचार वाढले आहेत. राज्याला गृहमंत्री आणि कृषीमंत्री असणं गरजेचं आहे. मंत्रिमंडळ विस्तार का होत नाही, हे आई तुळजाभवानीला विचारेन, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.