प्रणाली कापसे, मुंबई, 11 जुलै : राज्यात राजकीय भूकंपानंतर आता मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाची चर्चा होत आहे. सोमवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी झाल्याची माहिती समजते. जवळपास एक ते दीड तास ही बैठक सुरू होती. यामध्ये मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाबाबत चर्चा झाली. भाजप-शिंदेंच्या सेनेसोबत सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आता त्यांच्या खातेवाटपाची चर्चा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सोमवारी रात्री केल्याची माहिती समजते. यामध्ये राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांना खाते वाटप आणि भाजप, शिवसेनेचा मंत्रीमंडळ विस्तारात समावेश या मुद्दयांवर चर्चा झाल्याचे कळते आहे. Maharashtra Politics : शपथविधी झाला, पण खातेवाटप नाही, अजितदादांचं मंत्रिपद ‘जीआर’ने फोडलं? वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस रात्री सव्वा अकरा वाजता पोहोचले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार १२ वाजता वर्षावर दाखल झाले आणि दीडच्या सुमारास निघाले. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्री २ वाजून १० मिनिटांनी बाहेर पडले. अजित पवार बैठकीला येण्याआधी आणि ते गेल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात चर्चा झाली. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारांना पुन्हा अर्थमंत्रीपद मिळण्याचा अंदाज आहे, तसे स्पष्ट संकेतच राज्य सरकारच्या एका जीआरमधून मिळत आहेत, त्यामुळे अजित पवारांच्या अर्थमंत्रीपदामुळे शिंदेंच्या शिवसेनेतील नाराजी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सरकारच्या उर्जाविभागाचा हा जीआर आहे, ज्यात वित्तमंत्री म्हणून कुणाचेच नाव नाही. सरकारने नेमलेल्या नवीन समितीमध्ये पाच सदस्य आहेत, ज्याचे अध्यक्ष म्हणून उपमुख्यमंत्री आणि उर्जामंत्री देवेंद्र फडवणीस आहेत. पण, सध्या देवेंद्र फडणवीसांकडे अर्थमंत्रीपद असतानाही वित्तमंत्र्याच्या नावापुढे कुणाचेच नाव देण्यात आलेले नाही. देवेंद्र फडणवीसांकडील अर्थ खाते हे पुन्हा एकदा अजित पवार यांना दिलं जाणार असल्याची माहिती न्यूज18 लोकमतच्या सूत्रांकडून मिळतेय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.