भिवंडी, 01 फेब्रुवारी : मुंबईजवळील भिवंडीमध्ये स्फोटाची भीषण घटना घडली आहे. खोणी इथं भंगार गोदामात एका केमिकल टाकीचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. विडी पित असताना केमिकलचे टाकी उघडण्याचा प्रयत्न केला आणि स्फोट झाला, अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी शहरालगत तलवली नाका येथील खोणी इथं भंगार गोदामात आज सकाळी 8.30 च्या दरम्यान ही घटना घडली आहे. रमजान मोहम्मद जमील कुरेशी अंदाजे (वय 45) आणि मोहम्मद इसराइल शेख (वय 38) अशी मृतांची नाव आहे.
नेहमीप्रमाणे कुरेशी आणि मोहम्मद शेख हे आलेले भंगार तपासून वेगळे करत होते. यावेळी काही केमिकलचे ड्रम आले होते. केमिकलचे ड्रम तपासात असताना अचानक स्फोट झाला आणि दोघेही दूर फेकले गेले. दोघेही यावेळी विडी ओढत होते. त्यामुळे केमिकल गॅसचा संपर्क झाल्यामुळे स्फोट झाल्याचं मृतांच्या नातेवाईकांनी सांगितलं. हा स्फोट इतका भीषण होता की, दोघांच्या शरिराच्या चिंधड्या उडाल्या. गोदामात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. स्फोटाचा आवाज ऐकून स्थानिकांनी धाव घेतली.
(पुणे-सोलापूर महामार्गावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू)
या घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी धावून आले. विशेष म्हणजे, या केमिकलमुळे आग लागली नाही परंतु काही प्रमाणात धूर निघत होता. स्थानिक निजामपुरा पोलिसांनी घटनेची नोंद घेत दोन्ही शवं शासकीय रुग्णालयात रवाना केले आहेत.परंतु ड्रममध्ये नक्की कोणते केमिकल होते याची माहिती मिळू शकली नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: भिवंडी