मुंबई, 3 डिसेंबर : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून आता त्यांना Z दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. याआधी राणे यांना Y दर्जाची सुरक्षा दिली जात होती. या नव्या सुरक्षेमुळे राणे यांच्या सुरक्षेत सीआयएसएफच्या आणखी 6 कमांडोंचा समावेश करण्यात आला आहे.
नारायण राणे यांनी काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरुन नारायण राणे विरुद्ध ठाकरे सरकार असा संघर्ष बघायला मिळाला होता. विशेष म्हणजे या प्रकरणी अखेर नारायण राणे यांना रत्नागिरीत अटक देखील झाली होती. देशाच्या केंद्रीय मंत्र्याला अटक होण्याची महाराष्ट्रातील पहिलीच घटना होती. या घटनेनंतर केंद्र सरकारने या प्रकरणाचा अहवाल मागितला होता. त्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्रालयाने राणेंच्या सुरक्षेबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा : भारतात ओमायक्रोनबाधित आढळलेला पहिला रुग्ण हॉटेलमधून पळाला
नारायण राणे यांना याआधी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 19 डिसेंबर 2020 रोजी वाय दर्जाची सुरक्षा जाहीर झीली होती. त्याआधी राणे यांना राज्य सरकारकडून वाय दर्जाची सुरक्षा होती. पण राज्य सरकारकडून राणेंच्या सुरक्षेत कपात करण्यात आली होती. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने त्यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला होता. त्यानंतर राणेंना केंद्राकडून थेट वाय दर्जाची सुरक्षा जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार गेल्या वर्षभरापासून राणेंना 2 सीआयएसएफच्या कमांडोसह 11 सुरक्षा रक्षकांचं पथक तैनात होतं. आता केंद्राच्या झेड दर्जाची सुरक्षा दिल्याने सीआयएसएफचे 8 कमांडो राणेंच्या सुरक्षेसाठी तैनात असतील.
हेही वाचा : मुंबई पालिकेत राडा, भाजप-सेनेचे नगरसेवक भिडले
केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या Z दर्जाच्या सुरक्षेत 22 सुरक्षा रक्षक असतात. यामध्ये नॅशनल सिक्योरिटी गार्डच्या 4 ते 5 कमांडोंचा समावेश असतो. दिल्ली पोलीस किंवा सीआरपीएफच्या कमांडोंच्या नेतृत्वात ही सुरक्षा असते. या सुरक्षेच्या कॅटेगिरीत एस्कॉ्ट कारदेखील असते. या सुरक्षेत तैनात असलेल्या कमांडोंकडे सर्व प्रकारच्या मशीनगन आणि आधुनिक संचार साधनं असतात. विशेष म्हणजे या कॅटेगिरीत तैनात असलेले कमांडो हे मार्शल आर्ट शिकलेले असतात. त्यामुळे हत्याराशिवाय लढण्याचं कसब त्यांच्यात असतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.