शिवाजी गोरे, प्रतिनिधी रत्नागिरी, 25 ऑक्टोबर : उद्या 26 ऑक्टोबरला बुधवारी भाऊबीज आहे. याच भाऊबीजेसाठी पुण्यातून दापोलीला येणाऱ्या भावाच्या गाडीचा अपघात होऊन वॅगनार कार जळून कोळसा झाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. नेमकं काय घडलं - रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड रोडवर मौजे दापोली येथे मध्यरात्री बर्निंग कारचा थरार अनुभव पाहायला मिळाला. भाऊबीजसाठी पुण्यातून दापोलीला येणाऱ्या भावाच्या गाडीचा अपघात होऊन वॅगनार कार जळून कोळसा झाली आहे. सुदैवाने या कारमधील चार जण बचावले आहेत. मात्र, कारचा पूर्णपणे कोळसा झाला असून गाडीत ठेवलेल्या डब्यातील 8 तोळे दागिने सुद्धा वितळून गेले आहेत. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
रस्त्याशेजारी असणाऱ्या आंब्याच्या झाडावर कार आदळली आणि या कारने अचानक पेट घेतला. मात्र, कारमधील पती-पत्नी आणि दोन लहान मुले क्षणाचाही विलंब न लावता बाहेर पडले. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टाळली आहे. मात्र, कार जळून खाक झाली. हेही वाचा - फटाके फोडण्याचं नाव झालं, पुण्यात 17 आगीच्या घटना, यवतमाळमध्ये 3 दुकानं जळून खाक फटाक्याच्या ठिणगीने गोदामाला लागली आग - दरम्यान, विरार पूर्वेच्या गोपचरपाडा येथील एका इमारतीच्या तळ मजल्यावरील गोदामाला भीषण आग लागल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. या परिसरात तरुणांकडून दिवाळीचे फटाके फोडले जातं होते. तेव्हा फटाक्याची ठिणगी या बंद गोदामात पोहोचली आणि गोदामाला भीषण आग लागली. धुराचे मोठं मोठे लोळ बिल्डिंगमध्ये पसरल्याने रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे या संपूर्ण बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या नागरिकांनी बिल्डिंग बाहेर धाव घेतली. वसई पालिकेच्या अग्निशमन पथकाच्या जवानांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले आहे. या घटनेत गोदामातील संपूर्ण कपड्याचा माल जळून खाक झाली आहे.