मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'तुरुंगातल्या कैद्यांकडून अशी वाक्य घेऊन आले', भाजपचा संजय राऊतांवर पलटवार

'तुरुंगातल्या कैद्यांकडून अशी वाक्य घेऊन आले', भाजपचा संजय राऊतांवर पलटवार

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Shreyas

मुंबई, 7 डिसेंबर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून महाराष्ट्रातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. संजय राऊत यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. सरकार षंढासारखं नामर्दासारखं बसलं आहे, हो नामर्दच सरकार आहे, असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत यांच्या या वक्तव्याचे पडसादही उमटले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

'तुरुंगात राहिल्यानंतर काही कैदी भेटतात, त्या कैद्यांकडून काही वाक्य मिळतात. ती वाक्य संजय राऊत घेऊन आले आहेत. षंढ, मर्दानगी, आमदारांना रेडे म्हणतात. ही वाक्य त्यांनी जेलमधून आणली, तसं ते बरळत राहतात. महाराष्ट्राची संस्कृती त्यांना कळत नाही,' असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

शंभुराज देसाईंचाही पलटवार

संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर शिंदे सरकारमधले मंत्री शंभुराज देसाई चांगलेच आक्रमक झाले. 'संजय राऊत आपलं तोंड आवरा. साडेतीन महिने आराम करून आलात, परत अशी वेळ येऊ देऊ नका,' असा इशारा शंभुराज देसाई यांनी दिला.

दरम्यान शंभुराज देसाई यांच्या वक्तव्याचा संजय राऊत यांनी समाचार घेतला. 'मंत्री महोदय ही सरळ सरळ धमकी समजायची काय? महाराष्ट्राची बाजू लढणारे या सरकारचे शत्रू आहेत.सरकार अस्मितेच्या प्रश्नावर गप्प आहे. म्हणून जनता गप्प बसणार नाही.कायदा आणि न्यायालये दबावाखाली आहेत. हे पुन्हा सिद्ध झाले. सत्य बोलणारे तुरुंगात जातील..हाच अर्थ,' असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं.

CM एकनाथ शिंदेंचा एक फोन अन् बोम्मईंचं लगेच ट्विट! पण, शेवटच्या वाक्यात सीमावादावर मोठं भाष्य

काय म्हणाले होते संजय राऊत?

'महाराष्ट्राचं सरकार कुणाच्याही नावाने चालू द्या. महाराष्ट्राच्या अस्मितेचं, जमिनीचं रक्षण करणं जमलं नाही, त्या सरकारने एकही दिवस राहणं गरजेचं नाही. दोन मंत्र्यांनी काल शेपूट घातलं, डरपोक सरकार आहे. जनतेची काळजी नाही, सीमा कुरतडल्या जात आहेत. हे नामर्द सरकार आहे. तुमच्यासारखा नामर्द मुख्यमंत्री झाला नाही. हे डरपोक आहेत. काय कराल तुरुंगात टाकाल? आम्ही घाबरत नाही. घाबरलेल्या मंत्र्यांना आम्ही सुरक्षा देऊन नेतो. बेळगावला केंद्रशासीत करा,' असं संजय राऊत म्हणाले होते.

महाराष्ट्र-कर्नाटक वाद, देवेंद्र फडणवीस ऍक्शन मोडमध्ये, थेट अमित शाहंनाच केला फोन

First published:

Tags: BJP, Sanjay raut