मुंबई, 7 डिसेंबर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादामुळे पुन्हा एकदा राजकारण तापलं आहे. या मुद्द्यावरून दोन्ही राज्यांच्या सीमांवर तणावाचं वातावरण आहे, त्यातच तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन केला. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: त्यांच्यात आणि अमित शाह यांच्यात काय चर्चा झाली, याबाबत माहिती दिली.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी मी फोनवरून चर्चा केली. सगळी परिस्थिती मी त्यांच्यासमोर मांडली आहे. त्यांना हेही लक्षात आणून दिलं आहे, की विनाकारण महाराष्ट्रातल्या गाड्यांवर हल्ला होणं हे योग्य नाही. मी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशीही बोललो आहे, त्यांनी मला आश्वासित केलं आहे. मी गृहमंत्र्यांना विनंती केली आहे, की त्यांनीही यामध्ये लक्ष घालावं आणि तिकडच्या मुख्यमंत्र्यांना स्पष्टपणे सांगावं की अशाप्रकारे दोन्ही राज्यांमध्ये एकमेकांच्या गाड्यांवर हल्ले होणं अतिशय चुकीचं आहे, त्यामुळे त्यांनी ते तत्काळ थांबवावं, असं त्यांना सांगावं, अशी विनंती मी अमित शाह यांना केली आहे,' असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारचा धिक्कार असो म्हणत… ठाकरे गटाकडून कर्नाटक बस रोखल्या
मुख्यमंत्र्यांचाही अमित शाह यांना फोन
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना या मुद्द्यावरून फोन केला आहे. तसंच त्यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली.
'काल कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसोबत माझी चर्चा झाली. एसटी,गाड्यांची तोडफोड करणा-यांवर कठोर कारवाईचा निर्णय त्यांनी घेतलाय. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात असेपर्यंत दोन्ही राज्यातील जनतेला त्रास होवू नये, अशी आमची चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशीही याबाबतबत माझी चर्चा झाली. इथून पुढे असे प्रकार होणार नाहीत', अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
CM एकनाथ शिंदेंचा एक फोन अन् बोम्मईंचं लगेच ट्विट! पण, शेवटच्या वाक्यात सीमावादावर मोठं भाष्य
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amit Shah, Devendra Fadnavis