मुंबई, 6 डिसेंबर : कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागात तणावग्रस्त वातावरण निर्माण झालं आहे. या सीमावादामुळे कर्नाटकात महाराष्ट्राच्या काही वाहनांवर हल्ले झाले. तर दुसरीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यात कर्नाटकातील बसेसना काळा फासण्यात आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या फोनवरुन चर्चा केली. यानंतर बोम्मई यांनी ट्विट करत याची माहिती दिली. मात्र, आपण भूमिकेवर ठाम असल्याचेही ते सांगायला विसरले नाहीत.
याअगोदर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून राज्यातील बसेसला लक्ष्य केल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. तर विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने हा प्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी देखील राज्य सरकारला 24 तासांचा अल्टीमेटम दिला होता. या सर्व घडामोडींमध्ये आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.
Maharashtra Chief Minister Shri Eknath Shinde had telephonic discussion with me, we both agreed that there should be peace and law and order to be maintain in both the states. 1/2
— Basavaraj S Bommai (@BSBommai) December 6, 2022
काय म्हणाले कर्नाटकचे मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी माझ्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली, दोन्ही राज्यात शांतता आणि कायदा व सुव्यवस्था राखली पाहिजे यावर आम्ही दोघांचेही एकमत झाले. दोन्ही राज्यातील लोकांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध आहेत. मात्र, कर्नाटक सीमेबाबत आमच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. आणि कायदेशीर लढाई सुप्रीम कोर्टात सुरू राहील, असेही सांगायला बोम्मई विसरले नाहीत.
काय आहे प्रकरण?
कर्नाटकातील बेळगावी आणि इतर काही मराठी भाषिक गावांवर प्रशासकीय नियंत्रण ठेवण्याची मागणी महाराष्ट्र अनेक दिवसांपासून करत आहे. 1960 च्या दशकात राज्यांच्या भाषा-आधारित पुनर्रचनेदरम्यान हे मराठी-बहुल क्षेत्र कन्नड-बहुल कर्नाटकाला चुकीच्या पद्धतीने देण्यात आल्याचा महाराष्ट्राचा आरोप आहे. त्याचवेळी, सीएम बोम्मई यांनी नुकतीच महाराष्ट्रातील अक्कलकोट आणि सोलापूर या कन्नड भाषिक भागांचा कर्नाटकात समावेश करावा, अशी मागणी केली. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील काही गावांतील लोकांना दक्षिणेकडील राज्यात सामील व्हायचे आहे, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावादाचे हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. याबाबत बोम्मई म्हणाले की, सीमावादावरील कायदेशीर लढाई कर्नाटक जिंकेल, असा विश्वास आहे, कारण राज्याची भूमिका कायदेशीर आणि घटनात्मक दोन्ही आहे. एवढी वर्षे जुनी ही बाब पुन्हा दोन राज्यांमधील तणावाचे कारण कशी बनली, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. याची सुरुवात बेळगावी येथील कन्नड विद्यार्थ्याला कथित मारहाणीपासून झाली. कॉलेज फेस्टिव्हलमध्ये कर्नाटकचा झेंडा फडकवल्याबद्दल या विद्यार्थ्याला मराठी विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. कर्नाटक रक्षण वेदिके नावाच्या संघटनेने याचा तीव्र निषेध केला. यादरम्यान महाराष्ट्र क्रमांकाच्या अनेक वाहनांना लक्ष्य करून त्यांच्या काचा फोडल्याचे वृत्त आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Karnataka