नंदूरबार : राज्यात सध्या सावरकरांचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. भारत जोडो यात्रेदराम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आणि वादाला तोंड फुटलं. भाजप आणि मनसे राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावरून चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्यभरात आंदोलन करण्यात आलं. एकीकडे भाजप, शिंदे गट आणि मनसे काँग्रेसवर सडकून टीका करत असताना दुसरीकडे मात्र सावरकरांच्या मुद्द्यावर ठाकरे गटाने काहीशी मवाळ भूमिका घेतल्याचे दिसून आले. आता यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. बावनकुळेंनी नेमकं काय म्हटलं? उद्धव ठाकरे यांच्यामध्ये धमक असेल तर त्यांनी आधी महाविकास आघाडीमधून बाहेर पडावे आणि नंतर सावरकरांवरचं प्रेम सिद्ध करावं, असा खोचक टोला बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. तसेच त्यांनी सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलेल्या टीकेचा देखील समाचार घेतला आहे. उद्धव ठाकरे हे काँग्रेसधारजीने झाले आहेत. त्यामुळेच त्यांना आमचं सावकरांबद्दलचं आंदोलन दिखावू वाटतं असं त्यांनी म्हटलं आहे. हेही वाचा : ‘तुम्ही IAS अधिकारी असाल’, जाहीर कार्यक्रमात केसरकरांनी अधिकाऱ्याला झापलं, VIDEO राज्यपालांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया शनिवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. यावरून पुन्हा एकदा वातावरण तापल्याचं पहायला मिळत आहे. यावर देखील चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपाल कोणत्या संदर्भात बोलले हे माहीत नाही , मात्र छत्रपती शिवराय हे आदर्श असून, त्यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. हेही वाचा : ‘..असं ढोंगी सावरकर भक्तांना का वाटत नाही?’ राऊतांचा भाजपवर प्रहार, राहुल गांधींनाही सुनावले ‘गुजरातमध्ये 145 पेक्षा अधिक जागांवर विजय ‘ गुजरातमध्ये सुरू असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी नंदुरबारमध्ये धावती भेट दिली. मोदी आणि अमित शहांच्या नेतृत्वात गुजरातमध्ये भाजप 145 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. तसेच यावेळी त्यांनी धन्यवाद मोदी अभियानांतर्गत नंदुरबारमधून पाठवल्या जाणाऱ्या 70 हजार पोस्ट कार्डीची देखील पहाणी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.