मुंबई, 17 एप्रिल : शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यावर महाविकास आघाडीने राज्यात सरकार (Mahavikas Aghadi Government) स्थापन केलं. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मिळून सत्ता स्थापन केल्यापासून भाजपकडून वारंवार हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेला प्रश्न विचारण्यात येत आहेत. त्याच दरम्यान आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी महाआरती आणि हनुमान चालिसा पठण कार्यक्रमानंतर आता राज ठाकरेंनी आज पुण्यात दोन घोषणा केल्या आहेत.
राज ठाकरे म्हणाले, मला फक्त दोन गोष्टींची घोषणा आज आपल्यासमोर करायची होती. 1 मे महाराष्ट्र दिनी मी संभाजीनगर येथील सांस्कृतिक मंडळाचं मैदान आहे तिथे जाहीर सभा घेणार आहे. दुसरं म्हणजे 5 जून या दिवशी मी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह अयोध्येला जाणार आहे.
तर यापूर्वीच भाजपने सुद्धा 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी मुंबईत सभा घेण्याचं जाहीर केलं आहे. मुंबईत देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेत देवेंद्र फडणवीस यांची तोफ धडाडणार आहे. येत्या काळात होणाऱ्या मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सभेला मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे. या सभेत भाजपकडून मुंबई मनपातील भ्रष्टाचारावर भाष्य करुन पोलखोल करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.
3 मे पर्यंत भोंगे बंद झाले नाहीत तर...
राज ठाकरेंनी आजच्या पुण्यातील पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा मशिदींवरील भोंग्यांच्या संदर्भात दिलेल्या अल्टिमेटमवर भाष्य केलं आहे. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नाही तर सामाजिक आहे हे मी यापूर्वीच माझ्या भाषणातून सांगितलं होतं. भोंग्यांमुळे मुस्लिमांनाही त्रास होतो. मुस्लिम पत्रकाराने बाळा नांदगावकर यांना सांगितलं माझं मुल लहान आहे आणि त्याला त्रास होतोय सगळ्यांनाच होतो. मी स्वत: मशिदीत जाऊन हे सांगितलं असं त्याने सांगितलं.
वाचा : 'चलो अयोध्या' राज ठाकरेंनी तारखेसह केली मोठी घोषणा
राज ठाकरेंनी पुढे म्हटलं, हा विषय वर्षांपासून तसाच राहीलेला आहे. मला असं वाटतं की, तुम्ही जर पाच वेळा भोंगे लावणार असाल दिवसातून पाच वेळा आम्ही मशिदीसमोर हनुमान चालिसा लावू. देशभरातील माझ्या सर्व हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की, तयारीत रहा. 3 तारखेला.. आता त्यांचा रमजान सुरू आहे. परंतू 3 तारखेपर्यंत जर त्यांना समजलं नाही, कळालं नाही आणि या देशातील कायदा, न्यायव्यवस्थेपेक्षा स्वत:चा धर्म, लाऊडस्पीकर यांना मोठा वाटत असेल तर मला असं वाटतं जशास तसं उत्तर देणं तितकंच गरजेचं आणि आवश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.