विशाल रेवडेकर, प्रतिनिधी सिंधुदुर्ग, 9 फेब्रुवारी : भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांच्या जामीन अर्जावर सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने सुनावणी करत नितेश राणे यांना जामीन मंजूर केला आहे. शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात (Shivsainik Santosh Parab attack case) नितेश राणे यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र, तब्येत अस्वस्थ असल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात जामीन मिळवण्यासाठी नितेश राणेंची धावाधाव सुरूच आहे. मंगळवारी (8 फेब्रुवारी 2022) पुन्हा एकदा नितेश राणेंच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही बाजूने जोरदार युक्तीवाद पार पडला. कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतली. त्यानंतर आज न्यायालयाने आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. आमदार नितेश राणे यांना जामीन अर्ज मंजूर केल्यामुळे नितेश राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने 30 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. मात्र, कणकवली तालुक्यात त्यांना येण्यास बंदी घातली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली सोडून ते कुठेही येऊ शकतात जोपर्यंत दोषारोपपत्र दाखल होत नाही तोपर्यंत ते कणकवलीत येऊ शकत नाहीत. आठवड्यातून एकदा तपासासाठी त्यांना ओरस पोलीस स्टेशनला हजर राहावे लागेल. मंगळवारी काय घडलं न्यायालयात? नितेश राणे यांच्या वकिलांनी न्यायालयासमोर बाजू मांडताना सांगितले की, नितेश राणे हे पूर्वापासूनच या प्रकरणात पोलिसांना तपासात सहकार्य करत आहेत. नितेश राणे यांची पोलीस कस्टडीत 48 तास चौकशी झाली. यावेळी नितेश राणे यांच्या तब्येतीबाबतही वकिलांनी न्यायालयाला माहिती मंगळवारी (8 फेब्रुवारी) दिली. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयात नितेश राणे यांच्याबद्दल आरोप केला. ‘नितेश राणे हे जरी आमदार आहेत. तरी देखील वारंवार गुन्हे करण्याची त्यांना सवय झाली आहे. मारेकऱ्यांना दीड लाखाची सुपारी दिली गेली, त्यातील 10 हजार दिले गेले हे सचिन सातपुतेने 3 नंबरच्या आरोपीला दिली’ असा दावा घरत यांनी केला. तसंच, तपास अजून पूर्ण झालेला नाही. कोर्टात चार्जशीट दाखल नाही त्यामुळे जर नियमित जामीन मंजूर झाल्यास हल्ला प्रकरणात (तपासात) अडचणी निर्माण होऊ शकतात, त्यामुळे जामीन मंजूर करू नये, अशी मागणी घरत यांनी केली. तर, गंभीर स्वरूपाची जखम नसल्याचं माने शिंदे यांनी म्हटलं होतं. मात्र संतोष परब यांना गंभीर स्वरुपाची जखम होती. छातीवर गंभीर जखमी करून मारण्याचा प्रयत्न मारेकऱ्यांनी केला. अंगावर गाडी घालून पाडल्यावर संतोष परब यांच्या अंगावर मोटरसायकल पडली, संतोष परब यांच्या अंगावर गाडी पडल्यानंतर ती गाडी बाजूला न करता त्यांच्या डाव्या बाजूला छातीवर चाकूने हल्ला करणं हा पूर्वनियोजित कट आल्याचा युक्तीवाद प्रदीप घरत यांनी केला. वाचा : “सिंह कधीही गिधाडांच्या धमकीला घाबरत नाही”, देवेंद्र फडणवीसांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर नितेश राणेंच्या वकिलांचा युक्तिवाद संतोष परब यांना चाकूने नाही तर पेपर कटरने झाली आहे असे हायकोर्टाने म्हटलं आहे. संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत आणि त्यावेळीच्या मारहाणीचा प्रकार न्यायालयाला सांगत आहेत. नितेश राणे यांची पोलीस कस्टडीमध्ये 48 तास चौकशी झाली. पोलीस कोठडीच्या पूर्वी देखील नितेश राणे यांनी तपासात सहकार्य केले आहे, असा युक्तिवाद नितेश राणेंचे वकील मानशिंदे यांनी केला. न्यायालयाने सुनावली होती न्यायालयीन कोठडी 2 दिवसांची कणकवली पोलिसांची कोठडी नितेश राणे यांना कणकवली दिवाणी न्यायालयाने सुनावली होती. पोलीस कोठडी संपल्याने त्यांना शुक्रवारी (4 फेब्रुवारी 2022) कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी दोन्ही बाजुंकडून झालेल्या युक्तीवादानंतर नितेश राणे यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. जेलमध्ये न जाता नितेश राणे यांनी प्रकृती अवस्थेचे कारण देत सिंधुदूर्ग जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. छातीत दुखत असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले. त्यानंतर सिंधुदूर्ग जिल्हा रुग्णालयात हृदय रोग तज्ञ नसल्याने कोल्हापूर जिल्हा रुग्णालयात हलवण्याची तयारी सुरू झाली. दुसरीकडे नितेश राणे यांना जामीन मिळावा या करता त्यांचे वकील सिंधुदूर्ग जिल्हा न्यायालयात गेले खरे मात्र तपास अधिकारी उपस्थित राहिले नाही आणि सरकारी वकील प्रदीप घरत यांनी नितेश राणे प्रकरण दुसऱ्या कोर्टात वर्ग करावे असा अर्ज केल्याने नितेश राणे यांचे वकील आणि सरकारी वकिलांमध्ये जोरदार शाब्दिक खंडाजंगी झाली. त्यामुळे सुनावणी सोमवारी ढकलली होती. पण भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली. त्यामुळे नितेश राणे यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज (मंगळवारी) सुनावणी झाली. वाचा : ‘10 मार्चनंतर महाराष्ट्रात भाजपचं सरकार येईल’ चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आमदार नितेश राणे यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयातील तुळशी इमारतीमध्ये दाखल करण्यात आलं आहे.सीपीआर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी गिरीश कांबळे यांनी याबाबत माहिती दिली आहे. नितेश राणे यांच्यावर उपचार करण्यासाठी सीपीआर रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांची एक टीम तयार केली आहे. त्यामध्ये सर्व प्रकारच्या वैद्यकीय अधिकार्यांचा समावेश आहे. विशेषतः हृदयरोग, अस्थिरोग तज्ञ यांचाही समावेश यात केलेला आहे. दरम्यान तज्ञ डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सर्व तपासण्या करण्याचे काम झालेल्या असून त्याचे रिपोर्ट येणे बाकी आहे. दरम्यान सीपीआर रुग्णालय प्रशासनाने दक्षता घेतली असून कोल्हापूर पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये तैनात केला आहे. 2 फेब्रुवारीला नितेश राणे न्यायालयात शरण अटकपूर्व जामीन अर्जासाठी सत्र न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत धावाधाव करणारे भाजपचे आमदार नितेश राणे यांना अखेर न्याय व्यवस्थेपुढे शरण यावे लागले आहे. 2 फेब्रुवारी रोजी नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली दिवाणी न्यायालयात शरण अर्ज दाखल केला. त्यानंतर न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची म्हणजेच 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. सुरुवातीला न्यायालयाने नितेश राणे यांना दिलासा देत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. पण, सरकारी वकिलांनी जोरदार आक्षेप घेतला आणि कडाडून विरोध केला. अखेर सरकारी वकिलांचा युक्तीवाद आणि पोलिसांनी दिलेले सबळ पुरावे यामुळे नितेश राणेंना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







