जळगाव, 11 डिसेंबर: जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीचा आज निकाल लागला. या निवडणुकीत एकनाथ खडसे गटाचा पराभव झाला आहे. भाजपाला मिळालेल्या विजयानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांना जोरदार टोला लगावला आहे. ‘अहंकार माणसाला आत्मघातकी बनवत असतो, ज्यावेळी आपल्या मनामध्ये अहंकार निर्माण होतो त्यावेळी आपले शेवटचे दिवस सुरू होतात’ अशी टीका दूध संघाच्या विजयानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर केली आहे. ‘तेव्हा खडसेंना सर्व पदं मिळाली’ पुढे बोलताना महाजन यांनी म्हटलं की, एकनाथ खडसे हे जेव्हा भाजपात होते तेव्हा त्यांच्याकडे सर्व पदं होती. मात्र भाजप सोडून गेल्यानंतर साधं जिल्हा बँकचं चेअरमनपद देखील त्यांच्याकडे राहिलं नाही. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी कबूल करावं की त्यांना आता लोकांनी नाकारलं आहे. ज्यावेळी त्यांच्या मनामध्ये पक्षापेक्षा मी मोठा हा अहंकार निर्माण झाला तेव्हाच ते संपले होते, असं महाजन यांनी म्हटलं आहे. दरम्यान आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी कामाला लागा आणि आम्हाला सामोरे जा, असं आव्हानही यावेळी महाजन यांनी खडसे यांना केलं आहे. हेही वाचा : उत्तर प्रदेशात भाजपाच्या मताची टक्केवारी कशी वाढली; अजितदादांनी सांगितलं मुलायमसिंग कनेक्शन
मंगेश चव्हाणांचा टोला
दरम्यान दुसरीकडे जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत विजयी झालेले आमदार मंगेश चव्हाण यांनी देखील एकनाथ खडसे यांना टोला लगावला आहे. ‘माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांचा पराभव मी केला नाही. हा पराभव त्यांच्या मी पणामुळे झाला आहे. सत्ता असतांना मी आणि माझा परिवार अशी संकल्पना घेवून ते काम करत होते. त्यामुळे मतदारांनी विचार करून आम्हाला निवडून दिले अशी प्रतिक्रिया यावेळी मंगेश चव्हाण यांनी दिली आहे.