कोल्हापूर, 14 सप्टेंबर: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर पुन्हा एकदा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घणाघाती टीका केली आहे. उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना भाटगिरी हवी आहे. पण आम्ही भाटगिरी करणारे नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना हवं ते म्हटलं तर ते चांगलं. त्यांची स्तुती म्हणजेच भाटगिरी करावी, असं दोघांना वाटतं, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांची घणाघाती टीका केली. मात्र, त्यांची चूक दाखवली तर पत्रकार देखील जेलमध्ये जातात, असा टोलाही पाटील यांनी लगावला.
हेही वाचा...रामदास आठवले हे अर्धे शटर बंद झालेलं दुकान, अनिल परबांनी उडवली खिल्ली
चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधला. महाभकास आघाडीला सरकारला मराठा आरक्षण टिकवता आले नाही. राज्य सरकारकडे मराठा आरक्षणाबाबत इच्छाशक्ती नाही. मुख्यमंत्री घरी बसून राज्य चालवणारे आहेत. सरकारकडून मराठा समाजाला उल्लू बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश हे उत्तर असू शकत नाही. अध्यादेश काढला तरी याचिकाकर्ते स्वस्थ बसणार नाहीत, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी सरकारला दिला आहे.
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात 45 दिवसांत FIR का दाखल केला नाही, असा सवाल देखील
चंद्रकांत पाटील यांना केला आहे.
48 खासदारांसह 181 आमदारांचे पुतळे जाळणार
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी मराठा समाज आक्रमक झाल्याचं चित्र दिसत आहे. कोल्हापूरमध्ये येत्या 23 सप्टेंबर रोजी मराठा समाजाच्या वतीने गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. मराठा समाजातील नेते सुरेश पाटील यांनी ही माहिती दिली आहे. तर मराठा समन्वय समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात 48 खासदार आणि मराठा समाजातील 181 आमदारांचे प्रतिकात्मक पुतळे दहन करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
संसदेत सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात महाराष्ट्रातील 48 खासदारांनी मराठा आरक्षणाबाबत ठराव करावा, अशी मागणी मराठा समन्वय समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. तर कोल्हापूरमध्ये होणाऱ्या गोलमेज परिषदेमध्ये राज्यभरातील मराठा संघटनांचे नेते आणि पदाधिकारी या गोलमेज परिषदेत सहभागी होणार आहेत. याच परिषदेमधून पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. त्यामुळे या गोलमेज परिषदेमध्ये नेमका काय निर्णय होतो, याकडे आता दक्षिण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा...शिवसेना प्रवक्ते भडकले, मुंबई POK वाटत असेल तर कंगनानं बोरा बिस्तर गुंडाळावा
मराठा समाजाच्या वतीनं कोल्हापूरमध्ये रविवारी राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलन करण्यात आलं होतं. त्यानंतर गडिंग्लज तालुक्यात सोमवारी रास्ता रोको करण्यात आला. त्यानंतर मराठा समाजाचे नेते सुरेश पाटील यांनी गोलमेज परिषदेची घोषणा केली आहे. 1 ऑक्टोबरनंतर राज्यातील 181 आमदारांचे पुतळे जाळणार असल्याचा इशारा मराठा आरक्षण संघर्ष समितीनं दिला आहे.