मुंबई, 19 सप्टेंबर: कोरोना व्हायरसमुळे राज्यात लॉकडाऊनच्या काळात दारूचा महसूल फळल्यानंतर ठाकरे सरकार आता ई-बेटिंग नियमित करण्याचा विचार करत आहे. सत्तेचा मटका लागल्यानंतर जुगारावर प्रेम जडणे स्वाभाविक नाही का? त्यामुळे येत्या काही काळात राज्याचा महसूल व रोजगार वाढवण्यासाठी डान्सबार सुरू करण्याचा विचार आहे का? असा खोचक सवाल भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. सध्या आयपीएल सुरु झालं आहे. त्यात राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ठाकरे सरकारचा ऑनलाईन जुगाराला अधिकृत करुन गरिबांची घरे उद्ध्वस्त करण्याचा डाव आहे. अशी टीका आमदार भातखळकर यांनी केली आहे. हेही वाचा… #BREAKING: ‘कोविशिल्ड’ लस तिसऱ्या टप्प्यात, पुण्यात 4 हॉस्पिटलमध्ये मिळणार डोस राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ई-बेटिंग अधिकृत करणे कितीपत योग्य आहे, यासाठी वित्त विभागाचे अतिरिक्त प्रधान सचिव सुधीर श्रीवास्तव यांच्या अध्यक्षेखाली समिती नेमून अहवाल मागविला होता, असा गौप्यस्फोट आमदार भातखळकर यांनी केला आहे. त्या अहवालानुसार राज्यात लवकरच ई-बेटिंग अधिकृत करणार असल्याचे संकेत ठाकरे सरकारनं दिले आहेत. राज्याला यातून नाममात्र रक्कम मिळेल, परंतु त्यामुळे राज्यातील लाखो कुटुंब उद्ध्वस्त होतील. सरकारने याचा विसर पडू देऊ नये, असा सल्ला आमदार भातखळकर यांनी सरकारला दिला आहे.
लॉक डाउनच्या काळात दारूचा महसूल फळल्यानंतर ठाकरे सरकार आता इ बेटिंग नियमित करण्याचा विचार करते आहे.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 19, 2020
सत्तेचा मटका लागल्यानंतर जुगारावर प्रेम जडणे स्वाभाविक नाही का? येत्या काही काळात महसूल व रोजगार वाढवण्यासाठी डान्सबार सुरू करण्याचा विचारही करतील हे... pic.twitter.com/xxvTLHG5d1
राज्यात अमली पदार्थ तस्करी मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. त्यावर नियंत्रण मिळवणे सोडून आता पैशांसाठी जुगार अड्डे अधिकृत सुरु करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. कोणाच्या तरी हट्टापायी नाईट लाईफ सुरु करुन मुंबईतील तरुणांना नशेच्या आहारी लावण्याचे पाप या सरकारने या पूर्वीच केले आहे. हेही वाचा… अशी पेरणी तुम्ही कधीच पाहिली नसेल! शेतकऱ्यानं केलेल्या जुगाडाचा VIDEO VIRAL राज्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार चांगले मार्ग शोधायचे सोडून सरकार गरिबांना उद्ध्वस्त करण्याचा मार्ग स्वीकारत आहे. यातून ठाकरे सरकारच्या नीतिमत्तेची पातळी दिसून येते, अशी घणाघाती टीका महाविकासआघाडीवर केली आहे. पैशांसाठी ठाकरे सरकार पुढील काही दिवसांमध्ये डान्स बारही सुरु करेल, असंही आमदार भातखळकर यांनी म्हटलं आहे.