मुंबई, 23 जुलै : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं विधान केलं आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केल्याने आपल्याला दु:ख झाल्याचं त्यांनी स्वत: मान्य केलं आहे. पण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या निर्णयामुळे आपल्याला शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यास मान्य करावं लागल्याची उद्विग्नता त्यांनी आज भाजपच्या मेळाव्यात व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील यांच्या भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यातील हा व्हिडीओ आधी भाजपच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर होता. पण चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरुन उलटसुलट चर्चा सुरु झाल्यानंतर भाजपने त्यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन हटवला आहे. “अक्षरशः मनावर दगड ठेवून आपण आणि देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नेतृत्त्वाने दिलेला निर्णय मान्य केला. केंद्राने दिलेल्या निर्णयानुसार एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केलं. याचं दुःख पचवून आपण सर्व आनंदाने पुढे गेलो आणि हा निर्णय स्वीकारला कारण राज्याचा गाडा पुढे हाकायचा होता. हे सरकार सत्तेत येणं खूप गरजेचं होतं. मोहन भागवत यांच्यावर टीका करण्याची त्यांची मजल गेली. त्यामुळे हे खूप गरजेचं होतं”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
“दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहणारे म्हणजे देवेंद्र फडणवीस. ये सगळे चुटुरपुटुर आहेत ना, वर्ष-सहा महिने, केंद्राने बोलावलं की घरी. अशांच्या पार्श्वभूमीवर सलग पाच वर्ष देवेंद्र यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर आपण कल्पना करा त्यांना महाराष्ट्रात उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घ्यावी लागली”, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी आपली उद्विग्नता व्यक्त केली. ( मुंबई मनपामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या घराची बत्ती गुल, वेगवेगळ्या चर्चांना उधाण ) “सलग पाच वर्षे त्यांनी यशस्वीपणे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली. यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारावी लागत आहे. जेव्हापासून शपथ घेतली तेव्हापासून आपण सर्व मुंबईत आहोत. त्यामुळे आता चला आपल्या घरी. कामाला लागू आणि जेव्हा सर्व ठरेल तेव्हा तुम्हाला बोलावलं जाईल आणि तेही वेळेत”, असंदेखील ते यावेळी म्हणाले. यावेळी चंद्रकांत पाटलांनी म्हटलं की आगामी काळात आपण खूप परिश्रम घेऊ. मुंबई महानगर पालिका आपण जिंकायची, असा विश्वासही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.