बीड, 01 फेब्रुवारी : अवकाळी पाऊस आणि सुलतानी संकटामुळे बळीराजा हवालदील झाला आहे. अशातच शेतमालाला भाव नाही, ऊस गाळपाचे नियोजन नाही म्हणून गांजा शेती करू द्यावी, अशी मागणीच एका अभियंत्याने केली आहे. त्याच्या या मागणीमुळे एकच खळबळ उडाली आहे.
कृषी अभियंता असलेल्या तरुण शेतकऱ्याने सोयाबीन, कापूस या पिकांना योग्य दर मिळत नाही. तसंच ऊस गाळपासाठी कारखान्याचे नियोजन नाही. त्यामुळे थेट बीड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन, शेतात गांजा लागवडीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी केल्याने एकचं खळबळ उडाली आहे. यावरून शेतमालाच्या हमी भावाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
(पुणे-सोलापूर महामार्गावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू)
बीड च्या माजलगाव येथील सुशिक्षित बेरोजगार कृषी अभियंता शुभम भास्कर माने यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, मी वाघीरा येथील सुशिक्षित बेरोजगार तरुण आहे. आपल्या जिल्ह्यात सध्या सोयाबीन, कापूस, तूर आदी पारंपरिक पिकांना योग्य दर मिळत नाही. त्यामुळे ही पिकं घेण्यास परवडत नाही. ऊस लागवड करावी तर पाण्याचा प्रश्न आहे.
(Miyawaki Method : जपानी पद्धतीनं सांगली झाली हिरवीगार, 2 वर्षांमध्येच तयार झालं जंगल, Video)
गतवर्षी अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झाला. यावर्षी माजलगाव तालुक्यात गेल्या वर्षी सारखेच चित्र दिसत आहे. 2022 वर्षातील नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात लागवड केलेले ऊस सध्याही शेतात उभे आहे. तोड मिळत नसल्याने वजन घटत चालले आहे. यामुळे ऊस ही परवडत नाही. याचा विचार केला तर साखर कारखान्यांकडे काही नियोजन आहे की, नाही ? असा प्रश्न पडतो आहे. यामुळे शेती नुकसानीत असून शेतकरी देशोधडीला लागला आहे.
उद्योग धंदे ही बीड जिल्ह्यात नाहीत. या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढायचं असेल तर जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांना गांजा लागवडीची परवानगी द्यावी, अशी मागणीच शुभम भास्कर माने याने केली आहे. या अभियंत्या मागणीमुळे एकच खळबळ उडाली असून त्याचे पत्र व्हायरल झाले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed