मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कोरोनाने निधन झालेल्यांच्या नातेवाईकांना सानुग्रह अनुदान मिळेना, तर शासनाने काहींना डबल दिले 50 हजार

कोरोनाने निधन झालेल्यांच्या नातेवाईकांना सानुग्रह अनुदान मिळेना, तर शासनाने काहींना डबल दिले 50 हजार

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

कोरोना मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सानुग्रह अनुदान वाटपात सावळा गोंधळ झाल्याचं उघडकीस आलं आहे.

बीड, 30 ऑगस्ट : कोरोना संकट काळात मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. पण हे सानुग्रह अनुदान वाटपात सावळा गोंधळ झाल्याचं बीडमध्ये उघडकीस आलं आहे. एकाच लाभार्थीला दोनवेळा अनुदान मिळाल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे अद्याप काही लाभार्थींना पैसे मिळाले नाहीत. तर काहींना दोन वेळेस पैसे आल्याने नेमका गोंधळ काय? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. कोरोना मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सानुग्रह अनुदान वाटपात सावळा गोंधळ झाल्याचं उघडकीस आलं आहे. राज्यातील 2053 मयत व्यक्तीच्या कुटुंबाना चक्क दोनवेळा अनुदान देण्यात आलं आहे. त्यातून तब्बल 10 कोटी 26 लाख रुपये शासनाच्या तिजोरीला भुर्दड बसला आहे. संबंधित प्रकार उघडकीस येताच राज्याच्या उपसचिवांनी हे दुबार जमा झालेले अनुदान वसूल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या प्रकरणी चुकीची अथवा बनावट माहिती देऊन शासनाचा निधी लाटण्याचे सिद्ध झाल्यास डिझास्टर मॅनेजमेंट गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. बनावट माहिती देऊन शासनाचा निधी लाटण्याचे सिद्ध झाल्यास संबंधितांवर दोन वर्षांचा कारावास होऊ शकतो. याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. (संतापजनक! खेळता खेळता मुलीला शेतात नेले, नंतर बलात्कार करुन गुप्तांगावर वार) बीड जिल्ह्यात कोरोना महामारीच्या संकटात पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात 2968 व्यक्तींचा जीव गेला. त्यात कुटुंबातील काही कर्ते पुरुष, महिला होत्या. तर काही ठिकाणी निष्पाप जीवांचे आई-वडील दोघेही हिरावले गेले. या अनुषंगाने शासनाने मृतांच्या नातेवाईकांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली. त्याप्रमाणे बीड जिल्ह्यात 3326 अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील 2117 अर्ज बरोबर असल्याचे सांगत त्यांना सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे. हे अनुदान मिळवण्यासाठी खोट्या नातेवाईकांची खरी स्पर्धा पाहायला मिळाली होती. यात तब्बल एक हजार अर्ज रद्द करण्यात आले होते. मात्र अनुदान वाटपानंतर आता नवीनच गोंधळ समोर आला आहे. जिल्ह्यातील तब्बल 29 लाभार्थींना दोन वेळा पन्नास-पन्नास हजार रुपये असे एक लाख रुपये मिळाले आहेत. तर राज्यातील तोच आकडा 2053 आहे. यामुळे तब्बल 10 कोटी 26 लाख रुपये शासनाच्या तिजोरीला भुर्दंड सहन करावा लागला. दुबार जमा झालेले अनुदान वसूल करण्याच्या सूचना राज्याचे उपसचिव संजय धारुरकर यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. (राजापूर रिफायनरीवरून शिवसेनेत धूमशान, आणखी एक आमदार सोडणार ठाकरेंची साथ?) कोरोनामुळे मयत व्यक्तीचे नातेवाईक ऑनलाईन अर्ज करतात. सर्व कागदपत्रे, बँक खाते, आधार क्रमांक, बँकेशी आधार लिंक असलेला मोबाईल नंबरही दिला जातो. मग दोनवेळा अनुदान कसे काय वाटप झाले? हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. ही योजना राबवताना संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने छाननीअंती मंजूर केलेल्या अर्जदारांच्या बँक खात्यात हे अनुदान कोटक महिंद्रा या बँकेमार्फत थेट जमा झाले मग दुबार अनुदान वाटप केले कसे? यात अधिकारी आणि लाभार्थीं यांचे आर्थिक हितसंबंध तर नाहीत ना? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. बीड जिल्ह्यात दुबार अनुदान प्राप्त झालेल्यांमध्ये बीड जिल्ह्यातील 29 जणांचा समावेश आहे. त्यापैकी एका कोरोना मयत व्यक्तीच्या नावे दोघांना अनुदान प्राप्त झाले असल्याचे समजले आहे .ज्या अर्जदारांच्या खात्यात सानुग्रह अनुदानाची रक्कम जमा केली आहे त्याची माहिती राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागास दिली. या माहितीचे विश्लेषण केले असता मयत व्यक्तीच्या नातेवाईकास अथवा अर्जदारास दोन वेळेस अथवा एकाच व्यक्तीला एपीबीएस तसेच एनईएफटीद्वारे दोन वेळेस सानुग्रह साहाय्य दिले असल्याचे निदर्शनास आले. त्या 29 व्यक्ती पैकी 1 व्यक्तीने पैसे परत केले आहेत. इतर 27 व्यक्तींकडून वसुली केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजदीप बनसोड यांनी दिली. कोरोना मृत अनुदान यादीत चुकीची अथवा बनावट माहिती देऊन शासनाचा निधी लाटण्याचे सिद्ध झाल्यास डिझास्टर मॅनेजमेंट अक्ट 2005, सेक्शन 52 नुसार दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा होणार आहे. संबंधिताकडून ही रक्कम वसूल करण्याच्या सूचनाही उपसचिव धारुरकर यांनी राज्यातील सर्व यंत्रणांना दिले आहेत. यामुळे कोरोना मृत कुटुंबातील सानुग्रह अनुदान वाटपातल चुकीच्या पद्धतीने अनुदान लाटनाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
First published:

Tags: Beed, Corona, Crime

पुढील बातम्या