मुंबई, 30 ऑगस्ट : राजापूर रिफायनरीवरून (Rajapur Refinery) शिवसेनेमध्ये (Shivsena) धूमशान सुरू आहे. बारसू, सोलगाव इथं रिफायनरी उभारणीला स्थानिक शिवसेना आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी समर्थन केल्यामुळे शिवसेना नेतृत्व नाराज आहे. स्थानिक जनतेच्या बाजूने शिवसेना असल्याची खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांची भूमिका आहे. राजन साळवी यांनी घेतलेल्या समर्थनाच्या भूमिकेवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राजन साळवी यांनी राजापूरच्या रिफायनरीच्या समर्थनार्थ भूमिका घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना मातोश्रीवर बोलावलं आणि खडसावल्याचीही माहिती आहे. पक्षश्रेष्ठींनी रिफायनरीला विरोध केल्यास आमदार राजन साळवी वेगळी राजकीय भूमिका घेण्याची शक्यता आहे. राजन साळवींचं रिफायनरीला समर्थन हे त्यांचं वैयक्तिक मत असल्याची शिवसेना नेत्यांची भूमिका आहे, पण भास्कर जाधवांना (Bhaskar Jadhav) शिवसेना नेतेपद दिल्यामुळे राजन साळवी नाराज तर नाहीत ना? अशी चर्चाही सुरू आहे. नाणारमध्ये होत असलेल्या रिफायनरीला शिवसेनेने मोठ्या प्रमाणावार विरोध केला होता, यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना केंद्र सरकारला नाणारऐवजी राजापूरच्या बारसू, सोलगावमध्ये रिफायनरीसाठी जागा देण्याचा प्रस्ताव दिला होता. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात फक्त 3 आमदार शिल्लक आहेत. यात राजन साळवी, वैभव नाईक आणि भास्कर जाधव यांचा समावेश आहे. आता राजन साळवी यांनी वेगळी भूमिका घेतली तर शिवसेनेकडे 2 आमदार शिल्लक राहतील. विधिमंडळाचा पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच राजन साळवी शिंदे गटात जातील, अशी चर्चा सुरू होती, पण राजन साळवींनी हे वृत्त फेटाळून लावत आपण ठाकरेंसोबतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.