बीड,12 मार्च: सततचा दुष्काळ आणि नापिकी.. शेतीमध्ये काही पिकत नाही म्हणून गाव सोडून गुजरातला हमालीसाठी गेलेल्या एका तरुण शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्क्याने मृत्यू झाला. त्याचं कुटुंब उघड्यावर आलं. चार मुली आणि एक मुलाचा सांभाळ तरी कसा करावा या विवंचणेतून मृत शेतकऱ्यांच्या पत्नीनेही आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, नातेवाईकांनी तिला रोखल्याने मोठी अनर्थ टळला. आता जगू तरी कशी, असा आर्त टाहो शेतकऱ्यांची पत्नी फोडत आहे. संकटात सापडलेल्या या शेतकरी कुटुंबाला आर्थिक आधाराची गरज आहे.
पाटोदा तालुक्यातील येवलवाडी येथील पोपट गोरख टेकाळे हे कुटुंब उदरनिर्वाहासाठी गुजरातमधील अहमदाबाद याठिकाणी हमाली करून कुटुंबाचा गाडा चालत होते. मात्र, पोपट टेकाळे यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे त्यांच्या अंत्यविधीसाठी कुटुंबाकडे पैसे नव्हते. हमालांनी पैसे एकत्रित करून पोपट टेकाळे यांचे पार्थिव मूळ गावी पाठवले. नातेवाईकाने गावकऱ्यांनी मिळून अंत्यसंस्काराचा विधी पार पाडला. मात्र, आज या कुटुंबांमध्ये कर्ता पुरुष निघून गेल्याने संपूर्ण कुटुंब उघड्यावर आलं आहे तर चार मुली आणि एक मुलाला कसे सांभाळावे म्हणून पत्नीनेही आत्महत्येचा प्रयत्न केला. आता या मुलांना मी कशी सांभाळू, असा प्रश्न दैवशाला टेकाळे यांना पडला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून डोळ्यांतील अश्रू अजूनही थांबायचं नाव घेत नाही आहेत. पतीच्या निधनाने दुःखाचा डोंगर कोसळला मात्र भविष्यात या मुलांना कसे सांभाळावं, हे संकट मात्र दैवशाला यांना सतावत आहे.
हेही वाचा..शिष्यवृत्ती महाघोटाळा: धनंजय मुंडे यांनी दिली गैरव्यवहार झाल्याची कबुली
दैवशालानेही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. नातेवाईकांनी घराचं दार तोडून तिला वाचवलं. दोनच दिवस झाले होते मुलगा वारल्याच दुःख होत त्यातच सूनाने ही आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे आम्ही चिंतेत आहोत. यातच या मुलींना सांभाळावं कसं. इथे स्वतःचं पोट भरण्याची अडचण, त्यात सर्वांना आधार कसा द्यायचा, असा प्रश्न पडल्याचे पोपट टेकाळे यांचे वडील गोरख टेकाळे यांनी सांगितलं आहे.
पायल, सोनाली, मोनिका आणि निकिता या चार मुली आहेत. वडिलोपार्जित दोन एकर शेती मात्र त्यातही तीन भाऊ यामुळे सर्वांची पोट कशी भरणार. मोलमजुरी करून ठेवण्याची तरतूद करणारे पोपटे टेकाळे यांचा अपघाताने मृत्यू झाल्याने आता या कुटुंबात कर्ता माणूस कोणीच राहिला नाही. समाजातील काही दानशूर व्यक्तींनी मदत केली आहे. मात्र, या शेतकरी कुटुंबाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मदत करावी, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण सस्ते यांनी केली आहे.
हेही वाचा..मुंबईकरांचं स्वप्न भंगलं, आता सचिन तेंडुलकरची फलंदाजी बघायला मिळणार नाही
मोठी मुलगी पायल ही नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तर बाकीच्या तिघी पाचवी-सहावीत आहेत. या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी, तसेच पालनपोषण करण्यासाठी दैवशाला यांना मदतीची गरज आहे. समाज आणि समाजातील दानशूर व्यक्ती कडून मदत मिळाली तर हे कुटुंब पुन्हा उभं राहू शकते. तसेच या मुलांना चांगले शिक्षण मिळू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.