औरंगाबाद, 02 ऑगस्ट : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी दोन दिवसांपूर्वीच औरंगाबादचा दौरा केला होता. पण, त्यांचा हा दौरा आता वादात सापडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी औरंगाबादेत पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद शहरात आले होते. यावेळी वेगवेगळ्या कार्यक्रमांना शिंदेंनी हजेरी लावली होती. औरंगाबाद दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर रात्री 10 नंतर लाऊड स्पीकरवरून भाषण केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आनंद कस्तुरे यांनी क्रांती चौक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी रात्री 10 वाजेनंतर लाऊडस्पीकर लाऊन भाषण करण्यास मनाई असताना भाषण केले. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ( India@75 : देशाच्या अशा 5 नायिका ज्यांनी रात्रीतून ब्रिटीश सरकारला दिला हादरा ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध कृती केल्याची तक्रार केली आहे. शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत कार्यक्रम सुरू होते, असा दावाही कस्तुरे यांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार स्वीकारली आहे, मात्र अद्याप कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. (मुंबई मनपा : शिवाजी नगर वार्डात जनता पुन्हा समाजवादी पक्षाला संधी देणार का? ) दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुणे दौरा सुरू होण्यापूर्वीच वादात सापडला आहे. एकनाथ शिंदे समर्थक नगरसेवक नाना भानगिरे यांच्याकडून उभारण्यात आलेल्या उद्यानाला एकनाथ शिंदे यांचच नाव देण्यात आलं आहे. मात्र या नावाचा ठराव त्यांनी महापालिकेत दिला असला तरी त्याला मंजुरी देण्यात आलेली नाही. त्यातच हे उद्यान महापालिकेच्या जागेवर खाजगी विकासाकडून विकसित करण्यात आलं आहे. त्यासाठीची हस्तांतरणाची तांत्रिक प्रक्रिया ही अजून पूर्ण झालेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री वादात सापडलेल्या उद्यानाचं उद्घाटन करणार का असा प्रश्न आहे. यापूर्वी पंढरपूरमध्ये परवानगी नसलेल्या इस्कॅान टेंपलचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांनी केल्यामुळे वाद उभा राहिला होता. आज जर या उद्यानाच उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केलं तर पुन्हा वाद उदभवण्याची शक्यता आहे. मुळात मुख्यमंत्री कार्यालयाकडे असलेले प्रोटोकॅाल ॲाफिसर यांनी या बाबी तपासणे आवश्यक असताना वारंवार या पद्धतीच्या चुका केल्या जाताहेत ज्यावरून मुख्यमंत्री टीकेचे धनी होत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.