औरंगाबाद, 29 डिसेंबर : जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कामावरून घरी परतताना दोन सख्ख्या भावांना अज्ञात वाहनाने उडवले. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा भाऊ मृत्यूशी झुंज देत आहे. हे दोघे भाऊ खुलताबाद तालुक्यातील अब्दुलपूर तांडा येथील रहिवासी आहेत. सतीश विष्णू राठोड याचा या अपघातात मृत्यू झाला आहे. तर त्याचा भाऊ करण विष्णू राठोड याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. एकाचा मृत्यू घटनेबाबत अधिक माहिती अशी की, खुलताबाद तालुक्यातील अब्दुलपूर तांडा येथील सतीश विष्णू राठोड आणि करण विष्णू राठोड हे दोघे सख्खे भाऊ टाकळी राजाराय येथील गुऱ्हाळामध्ये मजूर म्हणून काम करत होते. सायंकाळी साडेसात वाजेदरम्यान गुऱ्हाळातील काम संपवून ते दुचाकीवर घराकडे परतत होते. घरी येण्यासाठी निघाले असताना टाकळी राजाराय परिसरातच त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. गंभीर अवस्थेमध्ये त्यांना औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना दुर्दैवाने सतीश विष्णू राठोड याचा मृत्यू झाला. तर करण हा मृत्यूशी झूंज देत आहे. हेही वाचा : प्रेमविवाहानंतर पहिल्याच रात्री समोर आलं पत्नीचं धक्कादायक सत्य, नवरदेवाची थेट पोलिसांत धाव वाहनचालक फरार दरम्यान या अपघातानंतर दुचाकीला धडक देणारा अज्ञान वाहनचालक अंधाराचा फायदा घेऊन वाहनासह पसार झाला आहे. दरम्यान या प्रकरणात खुलताबाद पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वाहनचालकाचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.