औरंगाबाद, 29 सप्टेंबर : शारदीय नवरात्र उत्सवास सोमवार पासून प्रारंभ झाला आहे. नवरात्र उत्सव सध्या धुमधडाक्यात सर्वत्र साजरा होत आहे. मागील दोन वर्षांमध्ये कोरोनाचे सावट असल्यामुळे सार्वजनिक सण उत्सवावर निर्बंध होते. परंतु, आता हे सावट दूर झाल्याने भक्तांमध्ये उत्साह संचारला आहे. याच पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या म्हैसमाळ येथे श्री गिरीजादेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी पाहिला मिळत आहे. औरंगाबादपासून 35 किलोमीटर अंतरावर व खुलताबाद येथून 11 किलोमीटर अंतरावर समुद्र सपाटीपासून 913 मीटर उंचीवर असलेले म्हैसमाळ गाव श्री गिरीजादेवीचे जागृत स्थान आहे. श्री गिरीजादेवीच्या मंदिरात नवरात्रीच्या उत्सव भक्ती भावाने मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दररोज सकाळी संध्याकाळी सनई चौघड्यांसह अखंड नंदादीप या ठिकाणी लावला जातो. हेही वाचा :
Video : औंधसूराचा वध करणारी यमाई देवी, मूळपीठचा आहे रंजक इतिहास
अशी सांगितली जाते अख्यायिका मराठवाड्याचे कुलदैवत असलेली श्री गिरीजादेवीची अख्यायिका अशी आहे की श्री गिरीजादेवी पार्वतीचे रूप आहे. देवीच्या अख्यायिकाचे वर्णन काशी खंडामध्ये अध्याय क्रमांक 49 मध्ये सांगतिलेले आहे, अशी माहिती मंदिर विश्वस्त मनोहर गणपत भारती सांगतात. नवसाला पावणारी देवी श्री गिरीजादेवी ही भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून देवीची ओळख आहे. यामुळे देवीकडे भाविक नवस करत असतात. नवस पूर्ण झाल्यानंतर भाविक या ठिकाणी येत असतात. यामध्ये काही भाविक पर्वताच्या पायथ्यापासून दंडवत घालतात तर काही भाविक तासंतास रांगेत उभे राहून ते देवीच्या दर्शनासाठी उभे असतात. हेही वाचा :
Pune : चतु:श्रुंगी मंदिराचा इतिहास माहिती आहे? स्वातंत्र्य चळवळीशीही होता संबंध, Video देवीचं आकर्षक रूप दरवर्षी नवरात्र उत्सवामध्ये म्हैसमाळ येथील श्री गिरीजादेवीचे आकर्षक रूप बघायला मिळते. देवीला सोन्या चांदीचे दागिने अस्सल सोन्याच्या माळा बहुमोल रत्ने, गोटे तोडे, पाटल्या, कंबरपट्टा, रत्नजोडे, टोपी, सौभाग्याच्या अलंकारांनी सजवले जाते. यामुळे श्री गिरीजादेवीचे एक आकर्षक रूप भाविकांना बघायला मिळतं. नेपाळच्या राणीने अर्पण केलेले रत्नजडीत हार हे श्री गिरीजादेवीच्या सौंदर्यात भर पाडते. यामुळे हे रूप पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या उत्साहाने येत असतात. मंदिराची दिनचर्या मंदिर सकाळी 6 वाजता उघडते सकाळची पूजा 8 वाजता होते. सायंकाळची आरती 8 वाजता होते. मंगळवारी या ठिकाणी विशेष पूजा अर्चा होत असते.
गुगल मॅप वरून साभार
कसे पोहचाल मंदिरापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथून 11 किलोमीटर अंतरावर ती म्हैसमाळ गाव आहे. या म्हैसमाळ गावामध्ये श्री गिरीजादेवीचे मंदिर आहे.