औरंगाबाद, 1 ऑक्टोबर : शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिकांना नवरात्री उत्सवामध्ये जिल्ह्याची ग्रामदैवत असलेल्या कर्णपुरा येथील तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्याची इच्छा असते. अशाच ज्येष्ठ नागरिकांना देवीचे दर्शन घडवून आणण्यासाठी ॲम्बुलन्स हेल्प रायडर ग्रुपने दर्शन दूत नावाचा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शहरातील ज्येष्ठ नागरिकांना तुळजाभवानी देवीचे दर्शन घडवून आणण्यात येत आहे. नवरात्र उत्सव म्हटलं की औरंगाबाद शहरातील नागरिकांना वेध लागतात ते कर्णपुरा येथील ग्रामदैवत तुळजाभवानीचे यामुळे जिल्ह्यासह विविध भागातील नागरिक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. मात्र, दिवसेंदिवस वाढत असलेली गर्दी त्याचबरोबर घरातील सदस्यांची नोकरी व बऱ्याचदा घरातील सदस्यांकडून ज्येष्ठांना घेऊन जाण्याची होणारी टाळाटाळ लक्षात घेऊन औरंगाबाद शहरातील ॲम्बुलन्स हेल्प रायडर ग्रुपच्या वतीने दर्शन दूत म्हणून संकल्पना सुरू केली आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांनी ॲम्बुलन्स हेल्प रायडर ग्रुपने दिलेल्या क्रमांकावर फोन करून माहिती दिल्यास त्यांना सकाळीच रिक्षात बसून देवीचे दर्शन घडवून आणलं जातं. यासाठी त्यांच्याकडून कुठलाही शुल्क आकारला जात नाही. हेही वाचा : Navratri : कालिका देवीला दिडशे किलोचा महिरप, शंभर तोळे सोने! पाहा Video 128 जणांना घडवून आणले दर्शन नवरात्र उत्सवाच्या सहाव्या माळेपर्यंत ॲम्बुलन्स हेल्प रायडर ग्रुपने 128 ज्येष्ठ नागरिकांना तुळजाभवानीचे दर्शन घडवून देण्याची सेवा केली आहे. सध्या त्यांच्याकडे 200 जेष्ठ नागरिकांची यादी असून त्यांना येत्या दोन दिवसांमध्ये दर्शन घडवून आणले जाणार आहे. तसेच व पुढच्या नवरात्र उत्सवामध्ये देवीच्या दर्शनासाठी ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात सोयीसुविधा देऊन यापेक्षा व्यापक स्वरूपात नियोजन करणार, असं ॲम्बुलन्स हेल्प रायडर ग्रुपच्या छाया देवराज यांनी सांगितले. अशी घ्या ग्रुपची मदत नवरात्र उत्सवामध्ये तुळजाभवानी देवीची दर्शन घेण्याची इच्छा असलेल्या व्यक्तीला एक दिवस अगोदर ॲम्बुलन्स हेल्पलाइन क्रमांक वरती फोन करून माहिती द्यावी लागते. त्यानंतर ग्रुप तर्फे ज्येष्ठ नागरिकांच्या वैद्यकीय परिस्थितीची माहिती घेऊन सकाळी 6 ते 11 दरम्यानची वेळ दिली जाते. या वेळेमध्ये ॲम्बुलन्स हेल्प राईट ग्रुपची रीक्षा ज्येष्ठ नागरिकांच्या दारात येते. त्यांना घरापासून घेऊन गेल्यानंतर दर्शन करून येईपर्यंत ग्रुपचे सदस्य ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेमध्ये असतात. यासाठी त्यांनी मोबाईल क्रमांक जारी केले आहेत. 88 88 81 90 17, 99 23 56 83 83, 91 12 27 17 12, 807893798 , 98 81 17 83 91 या मोबाईल क्रमांक वरती फोन करून ज्येष्ठ नागरिक मदत घेऊन तुळजाभवानीचे दर्शन घेऊ शकता. हेही वाचा : Aurangabad : नवसाला पावणारी गिरीजादेवी, वाचा काय आहे अख्यायिका आम्ही नेहमी नवरात्र उत्सवामध्ये तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी येत होतो. मात्र दिवसेंदिवस वय वाढत गेलं आणि यामुळे नवरात्र उत्सवामध्ये दर्शन घेण्याचा नाद आम्ही सोडला होता. मात्र ॲम्बुलन्स हेल्प रायडर ग्रुपच्या पुढाकाराने अनोखी संकल्पना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आमच्या सारख्या ज्येष्ठ नागरिकांना कधी शक्य नसलेले दर्शन या ग्रुपच्या माध्यमातून दिले जात आहे, अशा भावना ज्येष्ठ नागरिकांनी बोलून दाखवल्या. नवरात्र उत्सवामध्ये सर्व ज्येष्ठ नागरिकांना देवीचे दर्शन घेता यावे यासाठी ॲम्बुलन्स हेल्प रायडर ग्रुपचे सर्व सदस्य तळमळीने प्रयत्न करत आहेत. ज्येष्ठ नागरिकांचे दर्शन घडवून वेगळे समाधान आमच्या ग्रुपच्या सदस्यांना मिळत असल्याचं सर्व ग्रुपचे सदस्य सांगतात, असं ॲम्बुलन्स हेल्प रायडर ग्रुप प्रमुख संदीप कुलकर्णी सांगतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.